घाऊक बाजारात तूरडाळ ६० रुपये, तर हरभरा ८० रुपये किलो

चालू हंगामात मोठय़ा प्रमाणात झालेले उत्पादन आणि आयातीमुळे तूर व हरभरा डाळीचे दर कमालीचे घसरले आहेत. तूरडाळीचा घाऊक बाजारातील दर ६० रुपये, तर हरभरा डाळाची दर ८० रुपये प्रति किलोवर आला आहे. या दरांत आणखी घट होण्याची चिन्हे आहेत.

दुष्काळामुळे गेल्या हंगामात तूर, हरभरा, मूग आणि उडीद यांच्या उत्पादनात घट झाली होती. त्यातच व्यापारी वर्गाने साठेबाजी केल्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊन तूरडाळीने २०० रुपयांचा पल्ला गाठला होता. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने डाळींच्या आयातीचा निर्णय घेत ती स्वस्त धान्य दुकानांत उपलब्ध करून दिली. आयात झालेली डाळ आणि यंदा चांगला झालेला पाऊस यामुळे बाजारात यंदा डाळींची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. परिणामी डाळींचे दर कोसळले आहेत. यंदा शासनाने स्थानिक पातळीवर कडधान्य पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तसेच, बाजारातील वाढत्या दराचा लाभ उठविण्यासाठी शेतकऱ्यांनीही कडधान्य लागवडीस मोठी पसंती दिली. मोठय़ा प्रमाणात झालेली लागवड आणि त्यानंतर यंदा झालेला चांगला पाऊस आणि हवामान यामुळे डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. डाळींचे हे नवे उत्पादन गेल्या आठ दिवसांपासून बाजारात येऊ लागल्यानंतर दर कोसळू लागले आहेत. सांगलीच्या बाजारात दोन आठवडय़ांपूर्वी तूरडाळीचा घाऊक विक्रीचा दर क्विंटलला दहा हजारांच्या वर होता. तो सोमवारी पाच हजार ८०० ते सहा हजार रुपयापर्यंत खाली आला आहे.

गेल्या वर्षी रब्बी हंगामात पेरणीच कमी झाल्याने हरभरा कमी होता. यामुळे ऐन दिवाळी-दसऱ्यात हरभरा डाळ १५० रुपये प्रतिकिलो झाली होती. मात्र सध्या हरभरा सुगी सुरू झाल्यानंतर याही डाळीचे दर ८० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. बाजारात पालेभाज्यांचे दर कोसळले असल्याने डाळीचा ग्राहक मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याकडे वळला आहे. यामुळे डाळीचे दर उतरूनही उठाव मात्र कमी आहे. अद्याप पूर्ण क्षमतेने माल बाजारात आलेला नाही. आणखी १५ दिवसांत हरभरा व तूर बाजारात आल्यानंतर आणखी दर खाली उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

लातूरची तूर कर्नाटकात

दर वर्षी कर्नाटक प्रांतातील तूर लातूर बाजारपेठेत जादा भाव मिळतो म्हणून विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणावर यायची. मात्र, या वर्षी कर्नाटक व लातूर बाजारपेठेतील भावात फारशी तफावत नसल्यामुळे कर्नाटकमधील तूर बाजारपेठेत येणे पूर्णपणे बंद झाले असून उलट लातूर परिसरातील तूर कर्नाटक प्रांतात विक्रीसाठी जात असल्याचे चित्र आहे. दर वर्षी डिसेंबरपासून लातूर बाजारपेठेत १० ते १५ हजार िक्वटल तुरीची आवक होते. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन वाढले आहे. मात्र, बाजारपेठेत रोजची आवक पाच ते सहा हजार िक्वटल इतकीच आहे. दर वर्षी कर्नाटक प्रांतातून दररोज पाच ते सहा हजार िक्वटल तुरी विक्रीसाठी येत होत्या, त्या आता पूर्णपणे बंद आहेत. उलट लातूर व उस्मानाबाद परिसरांतील तुरी शेजारच्या कर्नाटक प्रांतातील बाजारपेठेत विक्रीसाठी जात असल्याचे चित्र आहे.