सण यावा तसा दुष्काळ येतो. मग सत्ताधारी व विरोधी पक्षांत दुष्काळ पाहण्याची चढाओढ लागते. अनेकांना लागलेला हा छंद आहे. वर्षांनुवर्षे पडणारा दुष्काळ मानवनिर्मित आहे. त्यावर सत्ताधारी, विरोधकांनाही काही करायचे नाही, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळ पर्यटनावर भाष्य केले. केवळ वक्तव्य करून काय उपयोग? उपाययोजना शोधायला हव्यात, असेही ते म्हणाले. महसूलमंत्री एकनाथ खडसे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वादाचा त्यास संदर्भ होता.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मंगळवारी औरंगाबादला आले. रात्री त्यांच्या स्वागतासाठी तुलनेने कमी गर्दी होती. या अनुषंगानेही ते मोकळेपणाने बोलले. गेली अनेक वर्षे विमानतळावर येऊ नका, असे मी सांगत होतो. तसे केल्याने प्रवाशांना त्रास होतो. मात्र, अनेक वर्षे कार्यकर्ते ऐकत नव्हते. काल गर्दी करू नका, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्ते फारसे दिसले नसावेत. सर्व ठिकाणी शक्ती दाखवायची असते का, असा सवालही त्यांनी केला. मराठवाडय़ातील दुष्काळाच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, की या सगळ्या समस्येची उत्तरे ब्लू प्रिंटमध्ये दिली आहेत. पण नव्या सरकारला काम करण्यास वेळ द्यायला हवा. केवळ मलमपट्टी होऊ नये. नेत्यांच्या धावणाऱ्या टँकरसाठी पाणीपुरवठा योजना अपूर्ण ठेवल्या जात नाहीत, हे तपासायला हवे. दरवर्षी ठरल्याप्रमाणे दुष्काळ येतो आणि तो पाहणे राजकारण्यांचा छंदच झाला आहे.
कोकणातील पाणी मराठवाडय़ात आणण्याबाबत सुरू असणारी चर्चा ‘अशक्य’ नाही. मात्र, तशी इच्छाशक्ती असावी लागते, असेही राज ठाकरे म्हणाले. कृष्णा-मराठवाडा व इतर अपुऱ्या प्रकल्पांसाठी निधी मिळत नाही तेव्हा असे प्रकल्प होऊ शकतील काय, असे विचारता वांद्रा-वरळी सी-लिंकसाठी १ हजार ४०० रुपये कोटी खर्च होतात. म्हणजे एक पूल उभारण्यासाठी हजारांपेक्षा अधिक कोटी रुपये आपण खर्च करतो. मग ग्रामीण भागातील लोकांसाठी हे का शक्य नाही? निधी हा प्रश्न नाही, त्याची होणारी ‘गाळणी’ ही समस्या आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘आकलनास उशीर लागतो’
सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे समजेनासे झाले आहे. अशी स्थिती महाराष्ट्रात पूर्वी कधी आली नव्हती. त्यामुळे नव्या राजकीय चित्राचे आकलन होण्यास जरा वेळ लागेल, असेही राज म्हणाले. वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अधिवेशनानंतर सादरीकरण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. डिसेंबरअखेरीस वा जानेवारीत प्रत्येक प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका त्यांच्यासमोर मांडली जाईल, असेही ते म्हणाले.