कणकवली नगर पंचायतीच्या वतीने येत्या ६ ते ८ मे या काळात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कणकवली काल, आज-उद्या’ या निबंध स्पर्धेसोबतच अनेक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

कणकवली नगर पंचायत महोत्सव नियोजन नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हेया पारकर, राजश्री धुमाळे, बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, दिवाकर मुरकर, सुमेधा अंधारी, मेघा गांगण, नंदिनी धुमाळे, नीलम पालव, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, सुरेश कामत, अप्पा सापळे, अनिल डेगवेकर, चित्रकार नामानंद मोडक, प्रा. राजेंद्र मुंबरकर व मान्यवर उपस्थित होते.

कणकवली शहरातील सर्व भागातील नागरीकांना पर्यटनाचा आस्वाद घेता यावा म्हणून शहराच्या विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. स्व. श्रीधर नाईक चौक ते नरडवे रस्ता असा फूड फेस्टिवल आयोजित करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर म्हणाले. कणकवली शहराला इतिहास आहे. कोकणचे गावी अप्पासाहेब पटवर्धन यांची कणकवली म्हणून ओळख आहे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कणकवली भेट हाही एक ऐतिहासिक क्षणही महत्त्वाचा आहे. त्यामुळे पर्यटन महोत्सव छानदार व्हावा तसेच कणकवलीतील सर्व कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे सुचविण्यात आले. कणकवली पर्यटन महोत्सवाचे आयोजन करून कणकवलीची ओळख, इतिहास व पर्यटनबाबत नियोजन करण्याचे ठरले. या महोत्सवात गायन, पाककला, बॅडमिंटन, निबंध, एकपात्री अभिनय, भजन स्पर्धा घेण्याचे ठरले.

सामाजिक विषयावर चित्ररथदेखील तयार करण्यात येणार आहे. या प्रत्येक चित्ररथाची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाने घ्यावी अशी सूचना अशोक करंबेळकर यांनी केली.