सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नाताळ सणाच्या सुट्टीच्या कालावधीत समुद्रकिनारे फुलून गेले आहेत. समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग आणि आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. या काळात सावंतवाडी पर्यटन महोत्सव असल्याने या महोत्सवातही पर्यटकांनी हजेरी लावली.
समुद्रकिनाऱ्यावर देवबाग, मालवण, तारकर्ली, आचरा, उभादांडा, वायंगणी, वेळागर, रेडी या भागात पर्यटकांची वर्दळ होती. देशी-विदेशी पर्यटकांची हजेरी असली तरी समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधांचा अभाव पर्यटकांना आढळून आला.
आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी आणि मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होती. समुद्रावर मौजमजा करणाऱ्या पर्यटकांनी केलेल्या गर्दीपेक्षा आंबोली व किल्ले सिंधुदुर्गची गर्दी उत्तम होती असे सांगण्यात आले.
सिंधुदुर्गच्या सागरी किनारी विदेशी पर्यटकही येत आहेत. या पर्यटकांना पायाभूत सुविधा आणि अरुंद रस्त्यांचा त्रास होतो. शिवाय मार्गदर्शक फलकही नसल्याने पर्यटकांची घोर निराशा होत आहे. या पर्यटकांच्या आगमन प्रसंगी एखाद्या मालवणी वाटसरूला त्यांनी इंग्रजी भाषेत माहिती विचारल्यावर वैचारिक गोंधळही निर्माण होत आहे.
आरोंदा आणि सातार्डा या दोन मार्गानी विदेशी पर्यटक गोव्यातून दुचाकी घेऊन समुद्रकिनाऱ्यावर येत आहेत. विशेषत: आरोंदा किरणपाणी या मार्गावरून बऱ्यापैकी विदेशी पर्यटकांचे आगमन होत असल्याचे सांगण्यात येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात तारकर्ली या पर्यटन स्थळी मोठय़ा प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात तर देवबाग या ठिकाणी पर्यटकांना जलक्रिडाचा लाभ उटविता येत असल्याने या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी या भागात होत आहे. जिल्ह्य़ात यावेळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.