सध्या उन्हाळा सुरू झाल्याने तसेच परीक्षा संपल्याने पालकांनी आपल्या कुटुंबासह फेरफटका मारण्यासाठी इंडोतिबेट बॉर्डरवर तसेच सिमला, नेपाळ, सिक्कीम आदी ठिकाणी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी भूकंप झाला आणि या भूकंपाचा थरार अनुभवल्याची माहिती िहगोली येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. स्नेहल नगरे यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिली.
शनिवारी नेपाळ येथे फार मोठा भूकंप झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांत भूकंपाचे हादरे बसले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आसाम, सिक्कीम या भागाला जोरदार हादरे बसले. या परिसरात िहगोलीतील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. जयदीप देशमुख, डॉ. व्यंकटेश दमकोंडावार, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. घट्टे, डॉ. विठ्ठल करपे हे कुटुंबीयांसह पर्यटनासाठी गेले आहेत. शनिवारी ते इंडोतिबेट सीमेवरील लाचु या भागातून गंगटोककडे येत असताना या ठिकाणी मोठा भूकंप झाला. वाहने रस्त्यावरच हलू लागल्याने भीतीचा थरकाप उडाला. त्यानंतर गंगटोकजवळील रूमटेक या ठिकाणी रिसोर्ट हॉटेलमध्ये सुखरूप पोहचल्याचे डॉ. नगरे यांनी सांगितले.
दरम्यान, आज दुपारी १२.४७ मिनिटांनी कबुतरांना खाद्यपदार्थ देत असताना अचानक जमीन हलण्यास सुरुवात झाली. मी ज्या ठिकाणी उभा होतो, तेथील खांब हलायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे हातातील खाद्यपदार्थ खात असताना दोन सेकंदांपूर्वीच सर्वच कबुतर उडून पत्र्यावर जाऊन बसले. हे पाहत असतानाच जवळील खांब हलून जोराचा आवाज झाल्याने भूकंपाचा मोठा थरार जीवनात अनुभवायला मिळाला असल्याचे डॉ. नगरे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
 िहगोली लोकसभा मतदारसंघातून इतर राज्यात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी अडचण भासल्यास तातडीने संपर्क साधावा. या शिवाय त्यांच्या कुटुंबीयातील नातेवाइकांचा संपर्क न झाल्यास त्यांनी कळमुनरी येथील काँग्रेस कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन खासदार राजीव सातव यांनी केले आहे.