पर्यटन हंगाम जवळ आलेला असताना सुरमई, पापलेट, बांगडा यासह सर्वच मासळीचे दर ५० टक्क्याने कमी झाल्याने खवय्येगिरी करणाऱ्या पर्यटकांची यंदा चांगलीच चंगळ होणार आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणातील सर्वच बंदरात स्थानिक बाजारात पाठवल्या जाणाऱ्या मासळीची आवक वाढल्याने मासळी बाजारात ‘स्वस्ताई’ निर्माण झाली असल्याची माहिती हण्र बंदरातील प्रसिद्ध मत्स्य व्यावसायिक अस्लम अकबानी यांनी दिली.
गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या मच्छीमारीच्या हंगामात वादळी वातावरणाने बोटी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र मासळीची आवक सर्वत्र वाढू लागली. यामध्ये निर्यातक्षम दर्जाचे सुरमई, पापलेट, कोळंबी यांच्यासह स्थानिक बाजारात पाठवली जाणारी मासळीही समुद्रात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ लागली. मुळात नवरात्रोत्सवातील उपवासाच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी मासळीचे दर काहीसे खाली उतरत असले तरी या काळात राज्यातील बंदरांतून ही मासळी मागणीअभावी इतर राज्यांमध्ये पाठवली जाते. यंदा मात्र अशी मागणी घटल्याने मासळीचे दर निम्म्याहून कमी झाले आहेत. याचा चांगला फायदा कोकणातील दापोलीसारख्या पर्यटनस्थळांना मिळण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मत्स्य व्यावसायिक अकबानी यांनी सांगितले, हण्र बंदरात हॉटेल व्यावसायिकांबरोबरच मासळी खरेदीसाठी स्वत: पर्यटकही उपस्थित राहतात. बंदरामध्ये उलाढाल मोठय़ा प्रमाणात होत असल्याने येथील दर वाढीव राहतात. त्यामुळे अनेक पर्यटक नाराज होतात. यंदा मासळीची आवक सर्वत्र अशीच राहिली, तर आगामी पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला मासळीचे दर पर्यटकांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारात यापूर्वी ५०० रुपयांना मिळणारी सुरमई, पापलेट हे मासे २०० रुपयांना मिळत आहेत. तर प्रतिकिलो १०० रुपयांचा बांगडा आणि ढोमा ३०-४०  रुपयांवर आला आहे. ही परिस्थिती आणखी आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाजही अकबानी यांनी व्यक्त केला.