राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर शहर जिल्हाध्यक्षाची निवड दि. २९ मार्चला तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षाची निवड १२ एप्रिलला होणार आहे. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी महापौर आ. संग्राम जगताप यांच्याशिवाय अन्य नावाची सध्या चर्चा होत नसली तरी ऐनवेळी शर्यतीत इतरांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षासाठी राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, घनश्याम शेलार, राजेंद्र कोठारी यांची नावे चर्चेत आहेत. तालुकाध्यक्षांची निवड ५ एप्रिलला होईल.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींकडून निवडीऐवजी नियुक्तीच होण्याची शक्यता अधिक आहे. पक्षाची सभासद नोंदणी सध्या सुरू आहे. सभासदांची अंतिम यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. त्याचा आढावा ग्रामीणसाठी नियुक्त केलेले निरीक्षक, पुण्याचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी गुरुवारी पक्षाच्या येथील कार्यालयातील बैठकीत घेतला. सभासद नोंदणीचाही आढावा मागील महिन्यात घेण्यात आला होता.
शहर जिल्हा संघटनेत अशा आढावा बैठका न झाल्याने कार्यकर्त्यांत चर्चा आहे. आ. जगताप सध्या विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यस्त असल्याचेही कारण त्यांचे समर्थक देतात. शहरासाठी निरीक्षक म्हणून नाशिकचे देवीदास पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पक्ष कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
आज आढावा घेताना शेवाळे यांनी जिल्हा मोठा असूनही सभासद नोंदणी कमी झाल्याची खंत व्यक्त केली. बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणीची पुस्तके पावती फाडल्यानंतर परत केली नसल्याचे निदर्शनास आले. जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्हय़ातील अनेक नेते पक्ष सोडून गेले. त्यामुळे संघटनेत विस्कळीतपणा आला आहे. जिल्हय़ात पुन्हा खंबीरपणे संघटना उभी करावी लागणार आहे. जिल्हय़ात सहकाराचे मोठे जाळे आहे. सहकारात सर्व पक्ष एकत्र आहेत. जिरवाजिरवीचे प्रमाणही मोठे आहे, त्याला आवर घालावा लागेल.
सुजित झावरे, फाळके, सोमनाथ धूत, तुकाराम दरेकर, कपिल पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम असा : दि. २२ मार्चला बूथ समित्यांची निवड, दि. २९ला नगर शहर जिल्हाध्यक्षांची निवड, दि. ५ एप्रिलला तालुका कार्यकारिणी, प्रत्येकी ६ जिल्हा व ३ प्रदेश प्रतिनिधींची निवड, दि. १२ एप्रिलला जिल्हा कार्यकारिणीची निवड. २६ एप्रिलला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांची निवड.