लग्नासाठी निघालेल्या अॅपे रिक्षाला ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात दहा जखमी झाले आहेत. ही घटना परभणी-मानवत रस्त्यावरील कोल्हापाटीजवळ रविवारी सकाळी ११ वाजता घडली.
पूर्णा तालुक्यातील कौडगाव येथील रेणगडे परिवारातील नातेवाइकाचा विवाहसोहळा मानवत तालुक्यातील इरळद येथे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास होता. त्यासाठी रेणगडे परिवारातील सदस्य गावातील दोन अॅपे रिक्षांमधून इरळद या गावी लग्नासाठी जात होते. अॅपे रिक्षामधील १५ जणांमध्ये महिलांचाही समावेश होता. दोन्ही रिक्षा सकाळी ११ च्या सुमारास परभणी-मानवत रस्त्यावरील कोल्हापाटीनजीकच्या पुलाजवळ आले असता या दोन रिक्षांपकी एमएच२२ यू६०४७ या समोर असणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या एमएच२२ एच५९५० या भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की यातील गंधारबाई मुगाजी काळे (वय ४५) व गंगाधर माणिक रेणगडे (वय ६०) हे जागीच ठार झाले. कौसाबाई नवनाथ रेणगडे यांचा कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात अहिल्याबाई रेणगडे, बालाजी रेणगडे, आबाजी कामाजी रेणगडे, शेषाबाई रेणगडे, सदाशिव रेणगडे, मथुराबाई पिसाळ, पांडुरंग रेणगडे, ओमकार रेणगडे, कमलबाई रेणगडे, सचिन वजीर (सर्व रा. कौडगाव) हे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील सचिन व आबाजी यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर लगेच दुसऱ्या रिक्षातील नातेवाइकांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी रामचंद्र विश्वनाथ रेणगडे यांच्या तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून चालक फरार आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक डी. के.चौरे यांनी भेट दिली. या अपघातामुळे विवाहसोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले असून कौडगाववर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती कळताच कौडगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती.