पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांचा शासन पातळीवर किंवा जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर कोणताही विचार करून मार्ग काढण्याचे सोडून पोलिसांच्या दंडुकेशाहीचा दणका देऊन पारंपारीक मच्छीमारांचे आंदोलन मोडीत काढणाऱ्या यंत्रणेच्या विरोधात मच्छीमार काळी दिवाळी साजरी करणार आहे. काळ्या पताका व काळे आकाशकंदील लावून प्रशासनाच्या झुंडशाहीला मच्छीमार निषेध करणार आहे.
पर्ससिन नेटधारक परप्रांतीय मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सधारकांशी संघर्ष करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारामुळे ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला. पर्ससिन नेटधारक गोव्यातील ट्रॉलर्सधारकांच्या धुडगुसाला पारंपरिक मच्छीमारांनी धडा शिकविला.
सागरी सुरक्षा कवचात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या मच्छीमारांनाच दंडुकेशाहीचा दणका बसला. आंदोलनात भाग घेतला म्हणून पारंपरिक दहा महिला मच्छीमारांना पोलीस कोठडीत टाकण्यात आले. आंदोलकाना भडकवीत असल्याचे कारण देत नॅशनल फिशरीजचे रविकिरण तोरसकर यांना पोलीस कोठडीत टाकले.
त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सुमारे २५ पारंपरिक मच्छीमारांना पोलिसांच्या खाकी वर्दीचा दणका बसला.
सागरी सुरक्षा कवच म्हणून समुद्रात गस्ती नौका जाते. त्यात पोलीस, कस्टम व अन्य खात्याचे कर्मचारी असतात, पण सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर धुडगूस घालणाऱ्या या ट्रॉलर्सधारकांना कधीही विचारणा होत नाही. मग सागरी सुरक्षा पारदर्शक कशी काय ठरते याचा पोलीस अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा.
उलट पारंपरिक मच्छीमारामुळे ४२ लाख रुपयांचा दंड सरकारला महसूल स्वरूपात मिळाला आहे.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस यंत्रणेने मिळून पारंपरिक मच्छीमारांचे आंदोलन ठेचून काढण्याचे ठरविले आहे. त्याला काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे आता मच्छीमारांना कळले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी मच्छीमारांसाठी काळी दिवाळी म्हणूनच साजरी होणार आहे. काळे कंदील लावून यंत्रणेचा निषेध करणार आहेत.
पारंपरिक मच्छीमार पोटाची खळगी भरण्यासाठी पर्ससिननेटधारक मच्छीमारीला विरोध करीत आहे, हे खरे असले तरी पर्ससिन मच्छीमारीमुळे मच्छी दुष्काळ ओढवणार आहे. त्याची शासनाला जाणीवही करून देत असताना शासनयंत्रणेने दंडुकेशाहीला साथ द्यावी, ही दुर्दैवी बाब असल्याचे मानले जाते.