पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शनिवार व रविवारी पुण्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले.
काम सुरू असताना द्रुतगती मार्ग बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली. आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. काम सुरू असताना अडथळा येऊ नये, म्हणून बोरघाटापासून खालापूर टोलनाक्यापर्यंतची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. द्रुतगती मार्ग सहा पदरी असून जुना मुंबई-पुणे महामार्ग चार पदरी आहे. एकाच वेळी दहा पदरी मार्गावरून धावणारी वाहने चार पदरी मार्गावर आल्याने शुक्रवारपासून वाहतूक कोंडी होत आहे.