चौकाचौकात सिग्नल असूनही वाहतुकीची शिस्त पाळण्यात पुणेकर खूपच मागे असल्याचे पाहायला मिळाले असून, समोर पोलिसांचा धाक असेल तरच सिग्नल व वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याचे ‘टीम लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत पाहायला मिळाले. त्यामुळे स्वयंशिस्त हा मुद्दा बहुतांश पुणेकरांना लागू होत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
‘लोकसत्ता’तर्फे प्रत्यक्ष सिग्नलच्या चौकांमध्ये करण्यात आलेल्या प्रातिनिधिक पाहणीत तब्बल एक-तृतीयांश वाहनचालक सिग्नल मोडत असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील दहा चौकांमध्ये ही पाहणी करण्यात आली. सिग्नल मोडण्याबरोबरच सर्वच चौकांमध्ये पादचाऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचेही पाहायला मिळाले. विशेषत: रस्ता ओलांडताना त्यांना कसरत करावी लागते. अक्षरश: जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. सिग्नल न पाळता वाहने आडवी-तिडवी येत असल्याने एकूण वाहतूक धोकादायक बनली असल्याचेही दिसून आले.
या पाहणीतील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे वाहतूक पोलीस नसतील तर सिग्नल पाळले जात नाहीत. ज्या चौकात पोलीस होते, तेथे सिग्नल तोडण्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी होते. मात्र, तेथेसुद्धा सिग्नलला थांबताना वाहने झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्याच्या पुढे आणून उभे करण्याचे प्रकार पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत खुलेआम सिग्नल मोडले जात नव्हते. मात्र, पोलीस नसलेल्या चौकात बेसुमार बेशिस्त असल्याचे पाहायला मिळाले. सिग्नल तोडले जात असल्याने अनेकदा अपघात होतील की काय अशीच स्थिती होती. त्यामुळे स्वयंशिस्त हा भाग पूर्णपणे मोडीत निघाल्याचेच पाहायला मिळाले.
 
दिलासा.. पण थोडासाच!
वाहतुकीच्या बेशिस्तीच्या गदारोळात काही सुखद घटनासुद्धा पाहायला मिळाल्या. सिग्नल तोडले जात असताना काही जण मात्र सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत असल्याचे दिसले. त्याच वेळी पाठीमागून येणारी वाहने कर्कश हॉर्न वाजवत असतानाही हे वाहनचालक शांत थांबून असल्याचे चित्र शहरातील सिग्नलवर दिसले. मात्र, अशा स्वयंशिस्त वाहनचालकांची संख्या मात्र नाममात्र होती.