शिर्डीहून निघालेली म्हैसूर एक्सप्रेस साखळी ओढून दरोडेखोरांनी चितळी ते पुणतांबे स्थानकादरम्यान लुटली. नगर जिल्ह्यातील गेले काही दिवस थांबलेले रेल्वे दरोडय़ाचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. साईभक्तांना त्याचा जबर फटका बसला असून त्यांच्याकडील लाखो रुपयांची दागिने लुटण्यात आले.
साईनगर-म्हैसूर (१६२१८) ही साप्ताहिक गाडी असून रात्री १.३० वाजता ती शिर्डीहून निघाली. चितळी ते पुणतांबे दरम्यान दरोडेखोरांनी साखळी ओढून ती थांबविली. प्रवासी गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत बंगळुरू येथील साईभक्तांना लुटले. चौघा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत प्रत्यक्ष लूट केली असली तरी इतरही त्यांचे साथीदार दबा धरून बसले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी लक्ष्मी रवीकुमार (बंगळुरू) यांच्यासह अन्य तीन महिला प्रवाशांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला असून साडेचार लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आल्याचे म्हटले आहे.