राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प.तील अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची िहमत दाखवणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजेंद्र भारती यांना बदल्यांचे सर्व नियम बासनात गुंडाळून अवघ्या आठ महिन्यांत बदलीची ‘शिक्षा’ देण्यात आली! अपंग व सेवानिवृत्तीला केवळ ११ महिने राहिले असताना त्यांची पाटोदा येथे बदली करण्यात आली. तसेच बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही आदेशात दिली आहे.
गेल्या २८ फेब्रुवारीला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारती रुजू झाले. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ केवळ ११ महिने बाकी आहे. जि. प.तील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सावळा-गोंधळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंतची मनमानी सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत कार्यालयात उपस्थित राहणारे भारती हे एकमेव अधिकारी आहेत. मागील काही महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून एकही विभागप्रमुख कार्यालयात सापडत नाही. दुसरीकडे गरव्यवहारांच्या आरोपांनी कारभार बदनाम झाला असताना भारती यांनी कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान अध्यक्ष अब्दुल्ला यांच्याशी वाद झाल्यानंतर भारती यांनी थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पदाधिकाऱ्यांच्या मनमानीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची िहमत दाखवणाऱ्या भारती यांना मात्र अवघ्या महिन्यात तडकाफडकी बदलीची शिक्षा मिळाली. गेल्या ११ सप्टेंबरला ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशात भारती यांना पाटोदा येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. बदलीचे सर्व नियम गुंडाळून काढलेल्या आदेशाविरुद्ध भारती यांनी प्रयत्न करू नयेत, या साठी आदेशामध्येच शिस्तभंग कारवाईची तंबी दिली आहे. अब्दुल्ला हे राज्यमंत्री सुरेश धस यांचे निकटवर्तीय असून मंत्र्यांनी वजन वापरून बदलीचे आदेश काढले. कार्यतत्पर अधिकाऱ्याला बदलीची शिक्षा मिळाल्याने कर्मचाऱ्यांत संताप आहे.