पाच महिन्यांपासून पगार नाही; कामबंद आंदोलन

आर्थिक डबघाईला आलेल्या सोलापूर महापालिका परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना मागील सलग पाच महिन्यांपासून पगार अदा झाला नाही. त्यामुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू  केले असतानाच एका आजारी कर्मचाऱ्याचा पैसे नसल्यामुळे वैद्यकीय उपचाराअभावी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

बसचालक एम. बी. मुल्ला असे पैशाअभावी वैद्यकीय उपचार न झाल्याने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात पालिका प्रशासनाला दोष देत आक्रमक भूमिका घेतली होती. मागील सलग पाच महिन्यांपासून परिवहन कर्मचाऱ्यांना पगार अदा झाला नाही. त्यामुळे त्यांना एकीकडे उपासमारीला तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे त्यांचे मानसिक संतुलनही ढळू लागले आहे. पगार मिळण्यासाठी गेल्या महिन्यात परिवहन विभागातील  तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस ‘कामबंद’ आंदोलन केले होते. तरीही अद्यापि पगार अदा होत नसल्याने कर्मचारी अक्षरश: हैराण झाले आहेत.

या पाश्र्वभूमीवर परिवहन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून यात परिवहन समितीचे सभापती राजन जाधव हेदेखील कर्मचाऱ्यांबरोबर आंदोलनात उतरले आहेत. हे आंदोलन सुरू असतानाच मुल्ला नावाच्या कर्मचाऱ्याचा पैशाअभावी वैद्यकीय उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुम्ंबीयांनी केला आहे. त्यामुळे आंदोलनाची संवेदनशीलता वाढली आहे.

बसचालक मुल्ला हे गेल्या ७ जानेवारी रोजी कामावर जात असताना वाटेत त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावर मोठा खर्च झाला. परंतु नियमित औषधोपचारासाठी पैसे उरले नसल्याने त्यांची अडचण झाली. ही बाब मुल्ला कुटुंबीयांनी पालिका परिवहन विभागाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली असता त्याची दखल घेतली गेली नाही.

दरम्यान, वैद्यकीय उपचाराचा खर्च झेपेना म्हणून मुल्ला यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तथापि, या प्रश्नावर पालिका प्रशासनाने संवेदनशीलता न दाखविता उलट, परिवहन कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा असल्याची नोटीस बजावली आहे.