सोलापुरातील अर्जुन कदम यांची गाथा

काळ झपाटय़ाने बदलतोय. जग एकमेकांच्या जवळ येते आहे. परंतु काही अवलियांना या बदलत्या काळाशी काही देणेघेणे नसते. अशाच एका अवलियाने वयाची नव्वदी गाठली तरी आयुष्यभर मोटार किंवा दुचाकीचा वापर चुकूनही केला नाही. घोडा हेच वाहन वापरणाऱ्या या अवलियाच्या या सवयीने अनेकांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत.

सोलापूर जिल्हय़ात करमाळा तालुक्यातील जेऊरनजीकच्या झरे गावचे अर्जुन कदम हे रहिवासी. त्यांनी वयाची नव्वदी गाठली आहे. वाढते वय आणि शारीरिक अशक्तपणामुळे त्यांना पायांनी धड चालताही येत नाही. परंतु ते आजही आपल्या घोडय़ावरूनच प्रवास करतात. लहानपणापासून घोडय़ाचा छंद जोपासल्याने घोडय़ानेही त्यांची साथ अद्यापि सोडली नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अर्जुन कदम हे आजही शारीरिक अशक्तपणावर मात करून शेतात कामे करतात. शेळय़ांना, गायी-म्हशींना चारा आणणे व घालणे, दूध काढणे अशी कामे ते रोज करीत असतात. एवढेच नव्हे तर शेतात पिकलेला भाजीपाला स्वत: बाजारात जाऊन विकतात. त्यासाठी त्यांना घोडय़ाची कायम साथ मिळते.

अर्जुन कदम यांच्या लहानपणापासून त्यांच्या घरात घोडे सांभाळले जात. वयाच्या अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षांपासूनच त्यांनी घोडय़ाची सवारी सुरू केली, ती आजपर्यंत सुरूच आहे. आपल्या कोणत्याही कामासाठी, नातेवाइकाच्या गावी लग्नकार्य असो वा अन्य कोणताही सुख-दु:खाचा कार्यक्रम असो, तेथे जाण्यासाठी अर्जुन कदम हे कधीही मोटारीचा किंवा दुचाकीचा वापर करीत नाहीत तर सदैव घोडय़ाचाच वापर करतात. बाजारहाट किंवा कुठला दौरा असला की त्यांची स्वारी घोडय़ावरच. दररोज ते २० ते २५ किलोमीटर अंतराची घोडेस्वारी न चुकता ठरलेली असते. जेऊर, पारेवाडी, इंदापूर, दौंड, भिगवण, करमाळा, राशीन आदी गावांना जायचे तर घोडय़ावरचा प्रवास कायम. घोडय़ावर एकदा स्वार झाले की कदम हे घोडय़ावरील मांड इतकी मजबूत ठेवतात की घोडय़ाच्या धावण्याचा वेग कितीही वाढला तरी त्याचा त्रास कदम यांना होत नाही. किंबहुना एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा पद्धतीने ९० वर्षांचे तरुण कदम हे घोडा पळवतात. घोडय़ावर स्वार होऊन घोडा पळवताना कदम यांच्या थरथरत्या शरीरालाही वेग येतो. ते जणूकाही वाऱ्याशी स्पर्धा करीत असतात.

वाढत्या वयोमानामुळे झरे व जेऊर भागात अर्जुन कदम यांना सारे जण प्रेमाने ‘आज्जा’ म्हणून संबोधतात. त्यांच्याकडे सध्या घोडी आहे. तिचे नाव ‘बुगडी’ आहे. बुगडीवर त्यांचे तेवढेच प्रेम आहे. अगदी घरातील माणसाप्रमाणे. मागील ८० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सहा घोडे बदलले आहेत. काळाप्रमाणे माणसाने बदलायला हवे, असे म्हटले जाते. परंतु अर्जुन कदम यांच्यासारखी काही अवलिया माणसे असतात ती केवळ आपल्याच तत्त्वावर आयुष्य जगतात. घरात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे अशा गोतावळय़ात ‘बुगडी’ घोडीदेखील तेवढीच प्रेमाच्या नात्याची आहे. ही ‘बुगडी’ नसेल तर आपल्या आयुष्याची चाके थांबतील, अशी धारणा अर्जुन कदम हे बाळगून आहेत.