रायगड लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीत मातब्बरांसमोर सर्वात मोठा पेच स्वकीयांकडूनच संभाव्य दगाफटक्याचा असून उद्या मतदानाच्या दिवशी अस्थिर व्होटबँकांच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते विश्वासू कार्यकर्त्यांमार्फत मोच्रेबांधणी करण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
रायगडमध्ये पहिल्यांदाच लोकसभेच्या िरगणात उतरलेल्या राष्ट्रवादीला नाराज काँग्रेसबरोबर अंतर्गत मतभेदांचाही सामना करावा लागणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षसंघटनेवर नारायण राणे यांची पकड अधिक आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात त्यांना राष्ट्रवादीकडून झालेला प्रत्यक्ष विरोध रायगडात तटकरे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यस्तरावर एकमेकांना संपवण्याच्या मानसिकतेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सिंधुदुर्गप्रमाणेच रायगडची निवडणूकही प्रतिष्ठेची ठरली आहे. साहजिकच काँग्रेसचे नेते प्रचारामध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याबरोबर प्रत्यक्ष दिसत असले तरी काँग्रेसच्या पारंपरिक व्होटबँका आघाडीच्या बरोबरीने राहण्याची शक्यता अजूनही धूसर आहे. कोकणात तटकरे यांचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यात वरिष्ठ पातळीवरून समझोता घडून आल्याने पक्षांतर्गत मतभेद दूर झाल्याचे संकेत आहेत. मात्र उद्या मतदानानंतरच हे मतभेद खरंच दूर झाले का, यावर शिक्कामोर्तब होईल.
दुसऱ्या बाजूला महायुतीमधील रिपाइं रायगडातही असंतुष्टच राहते आहे. त्यामुळे यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणाऱ्या त्यांच्या व्होटबँका या वेळी धनुष्यबाणाबाबत पुनर्वचिार करू शकतात. त्यातही महायुतीच्या अनंत गीते यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे तो शिवसेनेचे मातब्बर नेते रामदास कदम यांच्या नाराजीचा. त्यांनी अनंत गीते यांच्या प्रचाराला नकार देऊन आधीच महायुतीला अडचणीत आणले आहे. महायुतीतील याअंतर्गत मतेभदांतून अनंत गीते यांना घरचा अहेर मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही मातब्बरांसमोरील दगाफटक्याचा शेकापचे रमेश कदम यांना काही प्रमाणात फायदा होईल. मात्र त्यांनी साधलेले मतविभाजन कोणासाठी अधिक तोटय़ाचे ठरेल, याचे उत्तर निकालानंतरच स्पष्ट होईल. या दग्याफटक्याच्या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालानंतर विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून उत्तर रत्नागिरीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे.