आदिवासी संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

श्रीगाण येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी कातकरी समाज संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडीवरील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोयनाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप संजय नाईक याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्य़ातील विविध भागांतून आदिवासी व कातकरी बांधव या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी झाले. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जावी, खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जावी, खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, आदिवासी शाळकरी मुली आणि महिलांना संरक्षण मिळायला हवे. रायगड जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात अवैध गावठी दारू आणि देशी दारूचे धंदे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत, ते बंद करावेत यांसारख्या मागण्या या वेळी करण्यात आल्या. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये आणि या कायद्याची जिल्ह्य़ात सर्वत्र कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी भगवान नाईक, दत्ता नाईक, रेखाताई वाघमारे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर हेदेखील उपस्थित होते.