सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ यावली येथे वाहनांच्या तिहेरी अपघातात मोटारीतील एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. मोहोळ पोलीस ठाण्यात टँकरचालकााविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळीनिमित्त मूळ गावाकडे जाताना गुरमे कुटुंबीयांवर काळाने आघात केला.
प्रीतिका मनोज गुरमे असे मृत मुलीचे नाव आहे. तर तिचे वडील मनोज भानुदास गुरमे (३६,रा. निलंगा, जि. लातूर) व त्यांची पत्नी माहेश्वरी (३०) आणि मुलगी काजल (१०) असे तिघेजण जखमी झाले. गुरमे कुटुंबीय पुण्यात राहतात. त्यांचे मूळ गाव निलंगा आहे. दीपावलीनिमित्त गुरमे कुटुंबीय निलंगा येथे जाण्यासाठी पुण्याहून मोटारीतून निघाले होते. सोलापूरच्या अलीकडे मोहोळजवळ यावली येथे पाठीमागून एका टँकरने गुरमे यांच्या मोटारीला धडक दिली. त्यामुळे मोटार अचानक फिरून जवळच्या छोटा हत्ती वाहनावर आदळली. या तिहेरी अपघातात गुरमे कुटुंबीयांवर काळाने आघात करून त्यांची मुलगी हिरावून घेतली. छोटा हत्ती वाहनाचा चालक शाहनवाज शकील शहानूरकर (रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) याने मोहोळ पोलीस ठाण्यात टँकरचालकाविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे.