तापमापकातील पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवडय़ात सांगलीचे तापमान ३९ अंशांपर्यंत गेले. या वाढत्या उन्हाचा तडाखा माणसाबरोबरच चिमण्या पाखरांनाही बसतो आहे. गेल्या चार दिवसांत वाढत्या उन्हामुळे १४ पाखरे बेशुद्ध पडली. यापकी दुर्दैवाने उपचार सुरू असताना एका चिमणीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. सिमेंटच्या जंगलात पाखरांची वाढत्या उन्हामुळे पाण्यासाठी चालणारी तडफड सुसह्य व्हावी यासाठी इन्साफ फाऊंडेशनने १२ पाणपोई सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे सांगली पोलिसांनीही चिमण्या पाखरांना पाण्याची खास सोय केली आहे.
मुस्तफा मुजावर, इम्तियाज भालदार, तौफिक शेख, अमीन बेपारी, आदित्य पाटील या तरुणांनी चिमण्या व मुक्या पक्ष्यांसाठी मदतकेंद्रे सुरू केली आहेत. गेल्या आठ दिवसांत आठ चिमण्या, २ साळुंक्या, १ कावळा, १ घार आणि २ बगळे पाण्यासाठी तडफडत असल्याची माहिती इन्साफ फाऊंडेशनला मिळाली. यापकी एका चिमणीचा आज मंगळवारी उष्माघाताने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मात्र अन्य पक्षी परत आपल्या अधिवासात सोडण्यात पक्षिप्रेमी यशस्वी ठरले.
उन्हाळय़ात पाण्याअभावी पक्षी तडफडू लागतात. तर कधी पक्ष्यांना उष्माघाताला तोंड द्यावे लागते. पाणी पिण्यास तात्काळ न मिळाल्यास पक्षी आकाशातून कोठेही रस्त्यावर अचानक पडतात. या वेळी इन्साफचे कार्यकत्रे सुती कापड थंड पाण्यात बुडवून त्या पक्षाला आच्छादन देतात. पाखरांना पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी सांगलीतील आमराई, कॉलेज कॉर्नर, अंबाईनगर, गावभाग, िशदेमळा आदी ठिकाणी बंगल्यांच्या गच्चीवर १२ पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मातीची पसरट भांडी पाण्याने भरून ठेवण्यात आली आहेत. सांगली पोलिसांनी विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयात पक्ष्यांसाठी पाणपोई व दाण्याची व्यवस्था करून पाण्यासोबतच पक्ष्यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
पाखरांसाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण भागातही इन्साफने आवाहन केले असून भिलवडी, तासगाव, अंकली, बिसूर, आष्टा आदी ठिकाणी तशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुजावर यांनी सांगितले.