बीड तालुक्यातील मांजरसुंबा चौसाळा रोडवर असलेल्या वानगाव फाट्यावर सोमवारी पहाटे ट्रक आणि क्रुजरची (जीप) समोरा समोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात, क्रुजरमधील ४ जण जागीच ठार झाले असून, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिनेश करपे (५५), जयाबाई चोपडे(४५), अक्षदा चौधरी (१७) आणि प्रदीप खरपे (२६) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व बुलढाणा जिल्ह्यातील मोहताळ तालुक्यातील आहेत. नातेवाईकाच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरला जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून क्रूझरचा चालक अविनाश सपकाळसह अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी बीडमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.