शेंद्रा व सायळा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी व कुलगुरूयांच्यात झटापट झाल्याचे वृत्त आहे. नवा मोंढा पोलिसांनी २४ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, उद्या (शनिवारी) विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी सरकारने १९७२ मध्ये शेंद्रा, सायळा, बलसा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यात आले. विद्यापीठाने काही जमीन अतिरिक्त ठरविली. ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी विद्यापीठाच्या काही जमिनीवर वहिती करतात. या वर्षीही या जमिनीवर खरिपाची पेरणी केली. परंतु विद्यापीठाने पोलीस बंदोबस्तात हे पीक नष्ट केले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलु यांच्या दालनात हल्लाबोल केला. प्रकल्पग्रस्त व कुलगुरू यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाल्याचेही वृत्त आहे. किशोर ढगे यांनी कुलगुरूंना काळे फासण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. कुलगुरूंच्या दालनात गोंधळ सुरू असतानाच नवा मोंढा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी किशोर ढगे, गणेश ढगे, बाबासाहेब खटींग, सखाराम िशदे, कैलास पौळ आदी २४ जणांना ताब्यात घेतले.
लेखणी बंद आंदोलन
दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासनावर प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध करून लेखणी बंद आंदोलन केले. आंदोलनात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. बी. बी.भोसले, उपकुलसचिव आर. व्ही. जुक्टे, बी. एम. मोरे, व्ही. एन. नागुल्ला, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप मोरे, कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जी. के. लोंढे आदी सहभागी झाले. उद्या विद्यापीठ कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहेत.