या अगोदर महत्प्रयासाने सुरू झालेली व सोलापूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळणारी सोलापूर-मुंबई-सोलापूर विमानसेवा अचानकपणे बंद पडल्यानंतर आता पुन्हा ही विमनसेवा सुरू होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न हाती घेतले आहेत. सुप्रीम एव्हिएशन कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासाठी होकार दिला असून त्या अनुषंगाने उद्या शनिवारी दुपारी दोन वाजता सोलापुरात खासदार मोहिते-पाटील यांनी स्थानिक व्यापारी व उद्योजकांच्या प्रतिनिधींसह संबंधितांची बैठक बोलावली आहे.
खासदार मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी सकाळी सुप्रीम एव्हिएशन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्ली येथे चर्चा करून सोलापुरात नव्याने मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. ही विमानसेवा किती किफायतशीर असेल, याची हमी देताना     मोहिते-पाटील यांनी कंपनीला विमानसेवा सुरू करण्यास राजी केले. कंपनीने या प्रस्तावाला होकार देत विमानतळ प्राधिकरणाशी संबंधित अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी केल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.
ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरकरांचाही तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने उद्या शनिवारी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृहात खासदार मोहिते-पाटील यांनी  स्थानिक व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक व इतर संबंधितांची बैठक आयोजिली आहे. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल व्यापारी व उद्योजकांसह सोलापूरकरांनी समाधान व्यक्त करीत विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची मागणी केली आहे. यापूर्वी, २००८-०९ साली मोहिते-पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने किंगफिशर कंपनीने मुंबई विमानसेवा सुरू केली होती. त्यास प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. परंतु अचानकपणे ही विमानसेवा कोणतेही कारण न देता केवळ राजकीय आकसबुद्धीने बंद केली गेली होती.