सावकाराने लुबाडले आणि प्रशासनाने फटकारले, अशा दुष्टचक्रात सापडलेल्या बिरू दुधभाते या तरुण शेतकऱ्याने विमनस्क अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर तिरंगी झेंडय़ाच्या खांबाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. मागील ५ वर्षांपासून आपली जमीन मिळावी, सावकाराच्या जाचातून सुटका व्हावी या साठी बिरू धडपड करीत आहे. मात्र, त्याची धडपड गळ्याभोवती फास घेतल्यानंतरच प्रशासनाच्या लक्षात आली! जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
लोहारा तालुक्यातील एकोंडी येथील बिरू दुधभातेच्या वडिलांनी एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात निलंगा तालुक्यातील सावकाराला ६३ आर जमीन लिहून दिली होती. पुढे त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि सावकाराने जमीन हडपली. ती परत मिळावी, म्हणून बिरूने सावकाराविरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या. त्यानंतर निलंगा तालुक्यातील वैजिनाथ मारुती बनसोडे या सावकारावर गुन्हा दाखल झाला. पण बिरूला त्याची शेतजमीन मिळाली नाही. माझी जमीन मला परत द्या, अशी मागणी त्याने मागील ५ वर्षांपासून प्रशासनाकडे वेळोवेळी केली. मात्र, त्याचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी या बाबत लातूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर निलंगा पोलीस ठाण्यात वैजिनाथ मारुती बनसोडे या सावकारावर गुन्हा दाखल झाला. वडिलांनी कर्जातील रकमेची परतफेड केली होती. तशा नोंदीही त्याच्याकडे आहेत. शेती गेल्याने मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या बिरूने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अखेर चौकशी होऊन बनसोडेच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात कोरे मुद्रांक व बिरूच्या वडिलांनी केलेल्या व्यवहाराची कागदपत्रेही सापडली. इतर कागदपत्रांवरून अवैध सावकारी करणाऱ्या बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता शेती मिळेल, असे बिरूला वाटले. सावकारीचा गुन्हा दाखल झाला, तरी जमीन परत करण्याची तरतूद नाही. त्यामुळे खचलेल्या बिरूला जमीन सोडविण्यासाठी दुसरी जमीन सावकाराकडे गहाण टाकावी लागली.
बनसोडेला ३ लाख रुपये देण्यासाठी बिरूने दुसऱ्या सावकाराला ७७ आर जमीन देऊन ३ लाख ८५ हजार रुपये घेतले. पहिल्या सावकाराची रक्कम देऊन जमीन सोडवून घेतली. ६३ आर जमिनीसाठी ७७ आर जमीन मात्र पुन्हा सावकाराच्या घशात अडकली. आता दुसरा सावकार ३ लाख ८५ हजारांच्या मोबदल्यात ८ लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे बिरूचे म्हणणे आहे. पाच वर्षांपासून व्याजापोटी जमीन सावकाराच्याच ताब्यात आहे. या सर्व बाबींना कंटाळून बिरूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. माध्यम प्रतिनिधींची धावपळ व काही अधिकाऱ्यांनी तत्काळ घेतलेली दखल यामुळे त्याचा जीव वाचू शकला.
‘त्याच्यावर अन्याय झाला’!
बिरूवर अन्याय झाल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दुय्यम उपनिबंधकांना देण्यात आले. सावकाराने त्याच्यामागे लावलेला तगादा कायद्याच्या बडग्याने दूर केला जाईल. त्याची जमीन त्याला मिळवून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करील, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ
बिरूने ‘लोकसत्ता’शी प्रथम संपर्क साधताना जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून आत्महत्या करणार असल्याचे कळविले. त्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने शहर पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचे तत्काळ लक्ष वेधले. इमारतीवर तिरंगी झेंडय़ाच्या खांबाला सुताची दोरी बांधून गळफास घेण्याच्या तयारीत असणाऱ्या बिरूकडे सर्वाचे लक्ष गेले. निवासी उपजिल्हाधिकारी तांबे, तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी इमारतीवर जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी बिरूला रडू आवरेना. ‘तुझा प्रश्न निकालात काढू,’ अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गळफास बाजूला टाकून बिरू प्रशासनाला शरण आला.
बिरूची कैफियत
पाच वर्षांत तक्रारींचे शतक पूर्ण झाले! मात्र, सरकार अजूनही लक्ष देत नाही. पदरात दोन कोवळी कच्ची-बच्ची. घरात अठराविश्व दारिद्रय पाचवीला पुजलेले. हाता-तोंडाचा मेळ घालणे कठीण, तेथे सावकाराची कुठून भर्ती करू? बायकोचे बाळंतपणही स्वत:च्या पशाने करू शकलो नाही. आठ लाख रुपयांसाठी सावकार उरावर बसला. तीन वर्षांची मुलगी व लहानग्या मुलाला किमान आपल्या पश्चात तरी हे सरकार मदत करील, म्हणून तिरंगी झेंडय़ाच्या खांबालाच गळफास घ्यायचे ठरविले, अशी हृदय पिळवटून टाकणारी कैफियत बिरूने ‘लोकसत्ता’पुढे मांडली. पाच वर्षांपूर्वी (१३ मार्च २०११) सावकाराच्या कचाटय़ातून आपली जमीन सोडविण्यासाठी सुरू असलेली बिरूची धडपड ‘लोकसत्ता’नेच ‘हडपलेली जमीन मिळविण्यासाठी बिरूची धडपड’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती.