सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने शेतकरी, ऊसतोड मजूर व ऊसवाहतूकदारांच्या नावाने विविध बँकांकडून परस्पर लाखो रुपयांची कर्जे उकळल्याच्या तक्रारी वाढत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील भाटेवाडीच्या जैनुद्दीन बाशा शेख या ऊस वाहतूकदाराच्या नावावर देना बँकेकडून ‘लोकमंगल’ने १५ लाखांचे कर्ज परस्पर घेतल्यानंतर शेख यांना बँकेकडून कर्जवसुलीची नोटीस आली असतानाच दुसरीकडे अशाच प्रकरणात फसवणूक झालेल्या बार्शी तालुक्यातील इंदापूरच्या एका ऊसतोड मजुराने तक्रार न देण्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

महादेव मस्के या पीडित ऊसतोड मजुराने यासंदर्भात बार्शीच्या तहसीलदारांना व पोलिसांना दिलेल्या निवेदनात लोकमंगल साखर कारखान्याच्या हस्तकांनी आपणास ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर या प्रश्नावर बार्शी शहर व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. जीवराज आरगडे यांनी पीडित महादेव मस्के यांच्यासह घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत लोकमंगल साखर कारखाना व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेताना देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसह त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

महादेव मस्के व आपली पत्नी लक्ष्मी हिच्यासह २०१५-१६ साली उत्तर सोलापूरच्या बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्यासाठी ऊसतोड मजुरीचे काम करीत होते. गरिबीची परिस्थिती असलेल्या मस्के यांनी कोणत्याही बँकेकडून एका पैशाचे कर्ज घेतले नाही.

परंतु सोलापुरातील चाटी गल्ली शाखेच्या देना बँकेकडून मस्के यांना अचानकपणे नोटीस आली. ऊसतोडणी वाहतुकीसाठी १५ लाखांचे कर्ज घेतल्याचा व हे कर्ज थकीत ठेवल्याचे नमूद करीत व्याजासह १९ लाख १४ हजारांची रक्कम दहा दिवसांत भरण्याबाबत नोटिशीत नमूद केले होते. कोणाकडूनही एका पैशाचेही कर्ज घेतले नसताना देना बँकेने तब्बल १९ लाखांच्या कर्ज व व्याजाची रक्कम भरण्याबद्दल नोटीस बजावल्याचे पाहून मस्के यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी तक्रार केली. याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमांनी प्रसिध्द केल्या. तेव्हा लगेचच लोकमंगल साखर कारखान्याने संपूर्ण कर्जाची रक्कम देना बँकेत भरून टाकली.

या पाश्र्वभूमीवर मस्के यांच्या घरी चारचाकी मोटारीतून मध्यम वयाच्या पाच अनोळखी व्यक्ती आल्या. या व्यक्तींनी आपणास दमदाटी करून मोटारीत बसण्यास सांगितले व बळजबरीने मोटारीत बसवून गावाजवळील एका ढाब्यावर नेले. तेथे पुन्हा चाकूचा धाक दाखवून बळजबरीने दारू पाजवून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविषयी तू कोठे तक्रार केली तर तुझा अपघात होईल, तुला घरासहीत जाळून टाकू, अशी धमकी देत या गुंड व्यक्तींनी आपणास ढकलत ढाब्यामागे नेऊन गळा दाबून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप मस्के यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

शेतमजूर महादेव मस्के यांनी ही गंभीर तक्रार केली असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकमंगल साखर कारखान्यावर अशा गंभीर प्रश्नावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन केले होते.

अशाच स्वरूपाच्या तक्रारींवर परभणीच्या गंगाखेड साखर कारखान्यावर तसेच कराडच्या कृष्णा साखर कारखान्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. तर लोकमंगल साखर कारखाना अद्यापि मोकळा कसा काय राहू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सहकारमत्री सुभाष देशमुख यांनी लोकमंगल साखर कारखान्याने शेतकरी, शेतमजूर व ऊसवाहतूकदारांच्या नावाने कर्जे उचलताना कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही. याबद्दल केल्या जात असलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला आहे.