वर्षभरात ३ हजार ५३८ जणांना क्षयाची बाधा; तर ७५ रुग्णांचा मृत्यू

मुंबई पाठोपाठ आता रायगड जिल्ह्य़ातही क्षयरोग बळावला आहे. वर्षभरात जिल्ह्य़ातील ३ हजार ५३८ जणांना क्षयाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१६ मध्ये २२ हजार २८३ संशयित क्षयरूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ३ हजार ५३८ जणांना क्षयाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. यापकी एचआयव्ही बाधित क्षयरूग्णांची संख्या १६१ असून १ हजार ४०६ जणांच्या थुंकीतपासणीतून त्यांना क्षयरोग झाला असल्याचे समोर आले. क्ष किरण तपासणीतून ६४३ तर फुफुसांव्यतिरिक्त क्षयरोग झालेल्यांची संख्या ६५२ इतकी आहे. ८३७ जणांना क्षयाचा पुनरूद्भव झाला आहे.

औषधोपचारामुळे सकारात्मक बदलाचे प्रमाण ८६ .१२ टक्के इतके असून ११४१ रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.१७ टक्के इतके आहे. रायगड जिल्ह्य़ातील इतर भागांच्या तुलनेत मुंबई लगत असणाऱ्या तालुक्यात क्षयरोगाचा प्रमाण अधिक आहे. देशात वर्षभरात सुमारे १८ लाख लोकांना क्षयरोग होतो. त्यातील ३ ते ४ लाख रूग्णांचा मृत्यू होतो. दररोज १ हजार जण म्हणजे दर मिनिटाला २ रूग्ण क्षयरोगाने दगावतात. अलिकडच्या काही वर्षांंत क्षयरोगाबद्दल प्रचंड जनजागृती झाली असून त्यांच्याबद्दलचे गरसमजही कमी झाले आहेत. डॉट्स उपचार पद्धतीमुळे क्षयरोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण ७ पटीने घटले आहे. तसेच क्षयरूग्णांचे रूग्णालयात भरती होण्याचे प्रमाणही घटले आहे.

जिल्ह्य़ात मागील वर्षभरात जे ३ हजार ५३८ क्षयरूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक रूग्णसंख्या ही पनवेल तालुक्यात आहे. मुंबईला लागून असलेल्या  पनवेल तालुक्यात स्थलांतरीत लोकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यामध्ये क्षयाचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये विशेषत:  नाका कामगार,  वीटभट्टीवर तसेच इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कामगार आहेत. पनवेल तालुक्यात वर्षभरात तब्बल ९१७ क्षयरूग्ण आढळून आले आहेत. सुधागड तालुक्यात ही संख्या अवघी १७ इतकी आहे.

‘रायगड जिल्ह्य़ात १३ क्षयरोग पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच ४५ मान्यताप्राप्त सुक्षमदर्शक केंद्रातून क्षयरूग्णाचे रोग निदान करण्यात येते. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णास त्याच गावातून डॉट प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो. तसेच फेब्रुवारी २०१७ पासून जिल्ह्य़ात नव्याने डेली डॉट्स औषध प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो ‘. डॉ. सुरेश देवकर  जिल्हा क्षयरोग अधिकारी

untitled-20