‘आदर्श’ प्रकरणानंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून अशोक चव्हाण गेले व दिल्लीश्वरांनी पृथ्वीराज चव्हाण यांची राज्यात पाठवणी केली. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्याकडील उपमुख्यमंत्रिपद काढून त्या जागेवर अजित पवार यांची वर्णी लागली. ‘बाबा-दादा’ च्या जोडीने राज्याचा कारभार हाती घेतला. तेव्हापासून त्यांच्यात कोणत्या-ना कोणत्या कारणाने ‘तू तू-मै मै’ सुरूच आहे.
 िपपरी-चिंचवड मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेल्या मुख्यमंत्री व अजितदादांचे ‘तुझ्या गळा-माझ्या गळा’ चे दुर्मिळ चित्र दिसून आले, तेही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या साक्षीने.
मुख्यमंत्री व अजितदादा यांच्यातील अंतर्गत धुसफूस तसेच जाहीर खटके सर्वश्रुत आहेत. शुक्रवारी िपपरी पालिका व प्राधिकरणाच्या कार्यक्रमासाठी ते एकत्र आले, तेव्हा मात्र भाषणात त्यांनी एकमेकांचे भरपूर कौतुक केले. ‘मागच्या दारातून येणाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये’ अशा आशयाचे विधान अजितदादांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले होते. मात्र, यावेळी मुख्यमंत्री व आम्ही लोकांमधून निवडून आल्याचे व लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. िपपरी-चिंचवडकरांच्या प्रेमामुळे आपण १९९१ मध्ये पहिल्यांदा खासदार झालो, त्याच वेळी पृथ्वीराज चव्हाण हे देखील खासदार झाले होते, याकडे अजितदादांनी लक्ष वेधले. आमच्या दोघांची तिकिटे सर्वात शेवटी निश्चिच झाली होती, याची आठवणही करून दिली.
प्राधिकरण समिती न होण्याचे खापर आपल्यावर फोडले जाते, ते अतिशय चुकीचे असल्याचे स्पष्ट करताना आघाडी सरकार म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेत असतो, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आपला विरोध नसतो, असे अजितदादांनी सूचित केले. ज्या महापालिकेच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे टीका केली होती, येथील घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाईची घोषणा केली होती, त्याच मुख्यमंत्र्यांनी भाषणात पालिकेतील कारभाराचे प्रचंड कौतुक केले. िपपरी-चिंचवड म्हणजे नियोजनबध्द शहर, देशातील बेस्ट सिटी, स्वच्छ, सुंदर व उत्कृष्ट शहर असल्याचे सांगत त्यामागे अजितदादांचे योगदान असल्याचे प्रशस्तिपत्रही त्यांनी दिले. मात्र, ज्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री िपपरी पालिकेचे कौतुक करत होते. त्याच ठिकाणी महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत त्या प्रकरणांची चौकशीची मागणी करणारी निवेदने मुख्यमंत्र्यांना दिली जात होती. त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची निवेदने होती, हे विशेष.