तालुक्यातील कुळधरणजवळच्या हिवरवाडी येथे आज, रविवारी दुपारी दोन लहान मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. गौरव बापू गुंड (वय ६ वर्षे) व अच्युत गुलाब गुंड (वय ९ वर्षे) अशी त्या दोघांची नावे आहेत. ही दोन्ही मुले आई-वडिलांची एकुलती एक व एकाच शाळेत शिकणारी होती. या घटनेमुळे परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.
गौरव बापू गुंड हा कुळधरण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकत होता तर अच्युत गुलाब गुंड हा त्याच शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती. मुले घरीच होती. घरातील सर्व जण जवळच्याच शेतामध्ये काम करीत होते. दुपारी एकच्या सुमारास घरातील वडिलधाऱ्यांची नजर चुकवून गौरव व अच्युत दोघे शेततळय़ाजवळ गेले व तळय़ात पाणी फार नव्हते, त्यामुळे आपण पोहू या, असे म्हणत दोघेही पाण्यात उतरले, मात्र पाण्यात उतरल्यावर त्यांच्या उंचीपेक्षा जास्त पाणी असल्याने पाय जमिनीला टेकलेच नाहीत व पोहता येत नसल्याने दोघांचा दुर्दैवीरीत्या बुडून मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास मुले दिसत नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना हा प्रकार दिसला. या घटनेमुळे कुळधरण गावावर शोककळा पसरली. मुलांच्या आईचा हृदय हेलावून टाकणारा टाहो ऐकून अनेकांच्या डोळय़ांत अश्रू उभे राहात होते. सायंकाळी शोकाकुल वातावरणात या दोन्ही लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, सरपंच अशोक जगताप, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, मंगेश जगताप आदी उपस्थित होते.