माढा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या दादासाहेब साठे यांना पक्षाच्या उमेदवारीसाठी दोन कोटींची मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केल्याचा आरोप स्वत: दादासाहेब साठे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रदेश पक्षश्रेष्ठींकडेही तक्रार केली आहे.
दादासाहेब साठे हे माढय़ाचे माजी आमदार अ‍ॅड. धनाजी साठे यांचे पुत्र आहेत. साठे यांनी यापूर्वी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले होते. माढा मतदारसंघातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. या संदर्भात त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता पाटील यांनी उमेदवारी मिळवायची असेल तर पक्षनिधीच्या नावाखाली दोन कोटींची तयारी ठेवा, असे सांगितल्याचे साठे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या मतदारसंघातून काँग्रेसचे साखर सम्राट कल्याणराव काळे यांना उमेदवारी दिली आहे. काळे हे उमेदवारीसाठी पाच कोटी द्यायला तयार आहेत. भ्रमणध्वनीवर संतोष पाटील व दादासाहेब साठे यांच्यात झालेला याबाबतचा संपूर्ण संवाद स्वत: साठे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे उघड केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
या संदर्भात पक्षाचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष संतोष पाटील व माढा येथील पक्षाचे उमेदवार कल्याणराव काळे यांच्याशी संपर्क साधला असता उभयतांनी साठे यांच्या आरोपाचा इन्कार केला. पाटील यांनी साठे यांच्याकडे पैशाची मागणी केली नाही, या संदर्भात चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. तर उमेदवार काळे यांनीही आपण पक्षाकडे निधी देऊन उमेदवारी घेतली नाही, असा खुलासा केला आहे.