महापौर कळमकर यांची माहिती * केंद्राची अमृत योजना मंजूर
शहरात पाणीपुरवठय़ाची फेज-२ योजना सुरू असतानाच आता केंद्र सरकारने शहराच्या अमृत योजनेच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत १४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली. फेज-२ योजनेत समाविष्ट नसलेल्या कामांचा या योजनेत समावेश आहे. सौरऊर्जेवर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच शहरात यातून उद्यानेही विकसित करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने शहरासाठी पूर्वीच अमृत योजना मंजूर केली होती. मात्र प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्याने यातील अडथळा दूर झाला आहे. कळमकर यांनी सांगितले, की या योजनेच्या पाठपुराव्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले. मुळा धरणातील शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे मजबुतीकरण, मुळानगर ते विळद आणि विळद ते वसंत टेकडी अशी नवी मोठय़ा व्यासाची जलवाहिनी, वाढीव क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र अशा गोष्टींचा या योजनेत समावेश आहे. प्रकल्प अहवालानुसार पाणी योजनेसाठी १४९ कोटी, सौरऊर्जेसाठी २८ कोटी ७५ लाख आणि उद्याने व हरितपट्टे विकसित करण्यासाठी १ कोटी याप्रमाणे निधी मंजूर झाल्याने लगेचच ही कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती कळमकर यांनी दिली.
राज्य सरकारने ही योजना मंजूर केली होती. मात्र प्रकल्प अहवालास मंजुरी मिळवणे गरजेचे होते. महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यासाठी प्रयत्न सुरू होता, अशी माहिती कळमकर यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर हा प्रकल्प अहवाल मंजूर झाला आहे. शहराच्या पाणी योजनेला वीजबिलापोटी दरवर्षी तब्बल १७ कोटी रुपये खर्च येतो. पाणीपट्टीचे उत्पन्न आणि हा खर्च यात मोठी तफावत असून त्यामुळे ही योजना तोटय़ातही आहे. ही बाब लक्षात घेऊनच अमृत योजनेत शहराची पाणी योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी २८ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हेच या योजनेचे वेगळेपण असून, यात मनपाचे वीजबिलाचे कोटय़वधी रुपये वाचणार आहेत. तसेच उद्यानांसाठी खास निधी मंजूर झाला असून, शहर व उपनगरात त्याची प्राथमिक प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, या कामांचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे, असे कळमकर यांनी सांगितले.