विविध उद्योगधंद्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गुजरातमध्ये सध्या एका वेगळ्याच उद्योगाने उभारी घेतली आहे. कर्नाटक, आंध्र तसेच मध्य प्रदेशप्रमाणेच, प्रगतीचा टेंभा मिरविणाऱ्या गुजरातमध्येही महाराष्ट्रातून जाऊन गर्भलिंग चिकित्सा करण्याचे प्रमाण वाढले आहे. सातारच्या दलित महिला विकास मंडळाने सुरतमध्ये केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून हे उघड गुपित पुराव्यानिशी समोर आले असून, या प्रकरणी एकाच वेळी दोघा डॉक्टरांना सापळा रचून पकडण्यात आले आहे.  
 सुरतमधील ओमसाई क्लिनिक अ‍ॅण्ड लॅबोरेटरीचे डॉ. चेतन पटेल व वाणी हॉस्पिटलचे डॉ. केतन जरीवाला अशी या डॉक्टरांची नावे असून, या दोन्ही डॉक्टरांपर्यंत रुग्णाला घेऊन जाणारा एजंट हिरालाल मधुकर पवार यालादेखील अटक करण्यात आली आहे.
‘लेक लाडकी अभियानां’तर्गत नंदुरबार येथे महिला मेळाव्यात अ‍ॅड. वर्षां देशपांडे यांना सुरतमधील या उद्योगांची माहिती मिळाली होती.  या माहितीवरून त्यांनी एका बनावट ग्राहकाला सुरतमध्ये पाठवले. या कारवाईच्या वेळी गुजरातच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पूर्वसूचना देऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली, परंतु त्यांनी सहकार्य तर दूरच पण ही गुप्त माहिती गुजरातच्या नोकरशहांनी फोडली. परिणामी संबंधित रुग्णालयाने गर्भलिंग चिकित्सा करण्यास नकार दिला. नंतर सुरत येथीलच ओमसाई क्लिनिक येथे हरिलाल पवार याने संबंधित गरोदर महिलेला नेले. या ठिकाणी डॉ. चेतन पटेल याने १४ हजारांची रक्कम घेतली व या कामासाठी वाणी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. तेथे डॉ. केतन जरीवाला यांनी चिकित्सा करून या महिलेच्या गर्भपातास होकार दर्शविला.  
कसायांची केंद्रे  शासनाने गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे चालविली आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील गरोदर महिलांना शेजारच्या राज्यात पाठविले जाते. सोलापूरचे रुग्ण कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाऊन गर्भलिंग चिकित्सा करून घेतात, तर कोल्हापूरचे रुग्ण बेळगाव-चिकोडी तर नाशिक-धुळे-नंदुरबारचे रुग्ण गुजरातमध्ये सुरतला जातात. नागपूर, वर्धा भागांतील रुग्णांना मध्य प्रदेशात पाठविले जाते, तर नांदेड-परभणीच्या रुग्णांना आंध्रात पाठविण्यात येते. यात महाराष्ट्रातील संबंधित डॉक्टर व एजंटांकडून शेजारच्या राज्यातील संबंधित डॉक्टरांशी हातमिळवणी केली जात असल्याचे या निमित्ताने दिसून येते.