दुष्काळी अनुदानाचा दुसऱ्यांदा लाभ घेण्यासाठी तलाठय़ास लाचेचे आमिष दाखवून बँकेला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठय़ास पाचशे रुपयांची लाच देणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील दोन शेतकऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
 तडवळा येथील सुभाष दगडू पाटील व दिगंबर विठोबा सरक या शेतकऱ्यांनी शासनाकडून मंजूर झालेल्या दुष्काळी अनुदानाचा लाभ दोन वेळेस घेण्यासाठी आपसिंगा सज्जाचे तलाठी व सध्या तडवळा सज्जाचा अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या तलाठय़ास पशांचे आमिष दाखवून अनुदान बँकेतून मिळण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. शासनाकडून यंदा आलेले अनुदान बाधीत शेतकऱ्यांच्या नावे बँकेमध्ये जमा झालेले आहे. परंतु या अनुदानाच्या यादीत नजरचुकीने सुभाष िलबाजी पाटील व त्यांचे भाऊ दगडू िलबाजी पाटील यांची नावे दोनदा आली. हा प्रकार तक्रारदार तलाठय़ाच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधित बँकांना याबाबत लेखी पत्राद्वारे कळवून सुभाष पाटील यांना नजरचुकीने दुसऱ्यांदा मिळणारे अनुदान थांबविले. त्यानंतर तलाठय़ास या शेतकऱ्यांनी पशाचे आमिष दाखवून मोबाईलद्वारे वारंवार जास्तीच्या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर तक्रारदार तलाठय़ाने उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून वरील शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार दिली. एसीबीच्या उपअधीक्षक अश्विनी भोसले व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक असीफ शेख, दिलीप भगत, सुधीर डोरले, नितीन सुरवसे, बालाजी तोडकर, राहुल नाईकवाडी, धनंजय म्हेत्रे यांनी सापळा रचून दोन्ही शेतकऱ्यांना रंगेहाथ पकडले.