धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भावेर गावात अवैध व्यवसायावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांसोबत जुगार्‍यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेर गावातील ईदगाहजवळ असलेल्या सार्वजनिक जागेत काही व्यक्ती जुगार खेळण्यासाठी बसले होते. सोमवारी रात्री पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांचा ताफा पाहून जुगार खेळणाऱ्या काही मंडळींनी याठिकाणावरुन पळ काढला. यावेळी किशोर पाटील, इनकलाब भील हे पोलिसांच्या हाती लागले. पोलीस त्यांना वाहनात बसत असताना त्यांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की केली.

यावेळी कारवाईसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे शर्ट फाडून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर लोकांना उद्देशून या दोघांनी पोलीस गाडी पेटवण्याची भाषा देखील वापरली. पो. कॉन्स्टेबल सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.