शहराजवळील मनमाड रस्त्यावरील शिंगवे गावालगत (ता. नगर) झालेल्या अपघातात वडील व दोन शाळकरी मुली अशा तिघांचा मृत्यू झाला. अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. मृत मूळचे सावरगाव (नांदगाव, नाशिक) येथील व सध्या शिरूर (जि. पुणे) येथील रहिवासी होते.
रवींद्र दौलत राठोड (३५), त्यांच्या दोन मुली अश्विनी (१६) व सीमरन (१४) अशी दोघींची नावे आहेत. अश्विनी व सीमरन दोघी शिरूरच्या शाळेत अनुक्रमे इयत्ता १०वी व इयत्ता ९ वीमध्ये शिकतात तर वडील रवींद्र रांजणगाव एमआयडीसीमधील कारखान्यात नोकरीला आहेत. मुलींच्या सुट्टीमुळे रवींद्र त्यांना घेऊन काही दिवसांपूर्वी गावी सावरगाव येथे आले होते. त्यानंतर दोघींना मोटारसायकलवर बसून पुन्हा शिरूरला जात होते. वाटेत हा अपघात झाला.
दोन्ही मुलींचा जागेवरच मृत्यू झाला तर रवींद्र यांचा जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना काही वेळातच मृत्यू झाला. शिंगवे गावाच्या अलीकडे एक वळण आहे. या वळणावरच नगरकडे येणाऱ्या मोटारसायकलला (एमएच १५ सीझेड ७८७१) समोरहून येणाऱ्या मालमोटारीची (टीएन ५२ सी २२४५) धडक बसली. अपघातानंतर मालमोटारचालक पळून गेला. शिंगवे येथील ग्रामस्थांनी मृतदेह हलवले व जखमी रवींद्रला रुग्णालयात दाखल केले. याच वळणावर गेल्या महिन्यात जेईईटीच्या परीक्षेसाठी मोटारसायकलवरून नगरला येणाऱ्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाला होता. कालही याच वळणावर एक तरुण जखमी झाला. या वळणावर वारंवार अपघात होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले होते.
रस्त्यालगतची विहीर बुजवली
शिंगवे गावाजवळील वळणावर वारंवार अपघात होतात. आजचा अपघात झाल्यानंतर शिंगवे येथील ग्रामस्थ तातडीने तेथे जमा झाले. सरपंच अनिल डोळसे, उपसरपंच जाधव, पंचायत समिती सदस्य डोळसे तसेच प्रमुख ग्रामस्थांनी लगेच हे वळण सरळ करण्याचा व त्यालगतची विहीर बुजवून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली. त्यातून जेसीबी व ट्रॅक्टर लावून विहीर बुजवून सपाटीकरण करण्यात आले. दुपारी एक वाजता सुरू केलेले हे काम सायंकाळी साडेचार वाजता संपवण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानही केले.