पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात पाणी साठलेल्या खडड्यात पडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी ५  ते ६ च्या दरम्यान घडली आहे. पूनम राजवंशी आणि त्रियांशु राजवंशी अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,चिखली येथे गायरान असून त्या ठिकाणी नागपंचमी निमित्त झोका बांधण्यात आला होता.पूनम आणि त्रियांशु या मुली त्या ठिकाणी झोका खेळण्यासाठी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास आल्या होत्या.

झोका खेळून झाल्यानंतर दोघीजणी पाण्यात खेळण्यासाठी गेल्या मात्र खड्डा हा पाच ते सहा फूट खोल होता, या खड्ड्याचा दोघींनाही अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.विशेष म्हणजे या दोघींचं घरही शेजारीच आहे.

गायरान या ठिकाणी कामासाठी आलेल्या एका नागरिकाला ही बाब लक्षात आली, तेव्हा या दोन्ही मुलींना पाण्याबाहेर काढण्यात आलं ,त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. दोघींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र पूनम आणि त्रियांशु या मुलींना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या दोघीही मूळच्या बिहार येथील आहेत. त्यांचे आई वडील मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात.