हिंगोलीमध्ये गुरुवारी रात्री १० च्या सुमारास मोची समाजातील दोन गटात झालेल्या हाणामारीत महावीर गजानन कुरील व जितेंद्र प्यारेलाल कुरील या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत  १२ जण गंभीर जखमी आहेत. सार्वजनिक कार्यक्रम आणि खासगी मालमत्ता आदी बाबींवरून गेल्या दोन वर्षांपासून या दोन गटात धुसफूस सुरु होती. यापूर्वी या दोन्ही गटात लहान मोठे वादातून शुल्लक भांडणे झाली होती. मात्र गुरुवारी  हातात मिळेल ते शस्त्र घेऊन दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर वार केले. यात महावीर गजानन आणि जितेंद्र या तरुणांचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर पवन  कुरील, विजय कुरील, पवन हिरालाल कुरील, विनोद कुरील, कालीचरण कुरील, बजरंग कुरील, राजु कुरील, हिरालाल कुरील, अरुण कुरील, गजानन कुरील, आनंद कुरील व शाम महादेव कुरील हे १२ जण गंभीर जखमी झाले. त्याच्यांवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी गांधी चौकात दहीहांडीचा कार्यक्रम चालू होता. याचवेळी मोची गल्लीतील दोन गटात हाणामारी सुरु झाली. या गल्लीतील महिलांचा आक्रोश ऐकून हंडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जमावाने घटनास्थळी धाव घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गट कोणाचेच एेकत नसल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले. दोघांच्या मृत्यूनंतर मोची गल्लीत तणावाचे वातावरण आहे. मृत झालेल्या दोघांचे शवविच्छेन करुन त्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी हिंगोलीत आणण्यात आले, असून अंत्यविधी कार्यक्रमात वाद होवू नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.