गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या पक्ष प्रवेशावरुन भाजपमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते आहे. विश्वासात न घेता गुंडांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आमदार नाराज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे पालक मंत्र्यांशी चर्चा करुन पक्षप्रवेश दिला जाईल, असा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तसे स्पष्ट आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

‘खासदार संजय काकडेंच्या पुढाकाराने अनेक पक्षप्रवेश पार पडले आहेत. यावेळी पालकमंत्री आणि आमदारांनी विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजीची भावना आहे,’ असे गिरीश बापट यांनी म्हटले आहे. त्यामुळे खासदार संजय काकडे आणि मंत्री गिरीश बापट आणि इतर आमदार असे दोन गट भाजपमध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

गिरीश बापट यांनी संजय काकडेंना लक्ष्य केले असताना संजय काकडेंनीही बापट यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या संमतीनेच पक्षप्रवेश झाले आहेत’, असा पलटवार काकडेंनी केला आहे. त्यामुळे वादग्रस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या पक्षप्रवेशावरुन भाजपच्या नेत्यांमध्येच तू तू मैं मैं सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे.

पवन पवार, बाबा बोडके यांच्यासारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना देण्यात आलेल्या पक्षप्रवेशामुळे सध्या भाजपवर जोरदार टीका होते आहे. भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबतच विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळेच आता पक्ष प्रवेशावेळी आमदारांना विश्वासात घेण्यात येईल, असा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे.