छत्तीसगड-महाराष्ट्रदरम्यान कांकेर जिल्ह्य़ाच्या सीमेवर सी-६० पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एटापल्ली तालुक्यातील टेकमट्टा गावाजवळ नक्षलवादी व सी-६० पथकात चकमक होऊन सी-६० पथकाचे आत्राम व संदीप अमृतकर हे दोन जवान हुतात्मा, तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
छत्तीसगड सीमेलगत एटापल्ली तालुक्यातील कांदिली, टेकमेट्टा परिसरात सी-६० पथक जंगलात सायंकाळी जंगल पिंजून काढत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला.
यात सी-६० पथकातील आत्राम व संदीप अमृतकर गंभीर जखमी झाले.  गडचिरोलीस नेत असताना  रात्री उशिरा ते मरण पावले. यातील जखमी जवानाचे नाव कळू शकले नाही.
दरम्यान, यासंदर्भात गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, नक्षलविरोधी अभियान व चकमक रात्रीही सुरूच असून यासंदर्भातील संपूर्ण माहिती सोमवारी  कळू शकेल. घटनास्थळी अन्य पोलिस ठाण्यातून अतिरिक्त दल पाठविण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.