निरक्षरांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रौढ शिक्षण अभियानांतर्गत निरक्षरांसाठी विशेषवर्ग घेतले जात आहेत. जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ३४४ निरक्षरांना या माध्यमातून साक्षरतेच्या प्रवाहात आणून त्यांना अक्षरओळख करून दिली जात आहे. या अभियानातून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली.
जिल्ह्यात २ लाख ८ हजार ३४४ निरक्षर आहेत. यात ८० हजार ८१९ पुरुष व १ लाख २७ हजार ५२५ महिलांचा समावेश आहे. निरक्षर ग्रामस्थांना साक्षरतेच्या प्रवाहात आणून त्यांना अक्षरओळख घडविण्यासाठी प्रौढ शिक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. निरंतर शिक्षण विभागाकडून या अभियानांतर्गत पुस्तकांचे वाटप केले जाते. निरक्षरांना अक्षरओळख होऊन त्यांनाही लिहिता-वाचता यावे, या साठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्राम लोकशिक्षण समितीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार २४ ग्रामपंचायतींतर्गत प्रत्येकी दोन प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या प्रेरकांकडून ग्रामपंचायत स्तरावर निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षण करून जे निरक्षर आहेत त्यांना ग्रामपंचायत किंवा शाळेच्या ठिकाणी एकत्रित आणून साक्षरतेचे धडे गिरवले जातात.
महिलांसाठी ग्रामपंचायत, शाळा या ठिकाणी विशेषवर्ग घेतले जातात. प्रेरकांमार्फत त्यांना शिकवणी दिली जाते. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींतर्गत प्रौढ शिक्षण अभियानाने गती घेतली आहे. गाव, वस्ती, तांडे अशा ठिकाणी प्रेरक स्वत: जाऊन निरक्षरांची माहिती एकत्रित करून त्यांना प्रौढ शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात. बीड तालुक्यात सर्वाधिक ४५ हजार ४६२ निरक्षर आहेत. अंबाजोगाई १४ हजार ३२६, आष्टी २२ हजार ५१, धारूर ५ हजार ७९१, गेवराई ३६ हजार ९५७, केज १४ हजार ९७९, माजलगाव १४ हजार ६९६, परळी १६ हजार ९९९, पाटोदा १४ हजार ७७२, शिरूर १५ हजार २२७, वडवणी ७ हजार ८४ याप्रमाणे निरक्षर आहेत.
या सर्व निरक्षरांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रौढ शिक्षण अभियानांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. ज्या निरक्षरांचे ग्रामपंचायत स्तरावर वर्ग घेतले जातात, अशा नवसाक्षरांची लेखी परीक्षा घेतली जाते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ठिकाणी २३ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली. निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप, समन्वयक शेख अजीम यांनी परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली.