कमी पावसामुळे जिल्ह्य़ात सध्या १२८ गावे-वाडय़ांना १२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्य़ातील ७ मध्यम व ५७ लघुसिंचन प्रकल्पांत ५ टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्य़ात सध्या दोन लाख लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे.
जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत जिल्ह्य़ातील टँकरचा आकडा ३०० वर गेला होता. जवळपास महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने कमी झालेल्या टँकरमध्ये पुन्हा वाढ झाली. गेल्या सोमवारी १०६ गावे व २२ वाडय़ांमध्ये टँकर सुरू होते. पैकी १४ टँकर शासकीय, तर ११५ टँकर खासगी आहेत. सध्या ३०९ गावांसाठी २१६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. पैकी ६१ विहिरींवरून टँकर भरण्यात येत असून, १५५ विहिरींमधून अन्य उपाययोजनांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक ५६ टँकर अंबड तालुक्यात सुरू असून २१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्याद्वारे ८० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येस पाणीपुरवठा होत आहे. घनसावंगी तालुक्यात २५ टँकरद्वारे ३५ हजार लोकसंख्येस पाणीपुरवठा होत असून, ४५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जालना तालुक्यातील १० गावे, एका वाडीस १४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बदनापूर १४, जाफराबाद २, परतूर १०, मंठा ८ याप्रमाणे अन्य तालुक्यांत टँकरची संख्या आहे. केवळ भोकरदन तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.
कमी पावसामुळे जिल्ह्य़ातील ७ मध्यम व ५७ लघुसिंचन प्रकल्पांत सध्या सरासरी ५ टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी या वेळी जवळपास एवढाच उपयुक्त जलसाठा होता. जिल्ह्य़ातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी एक कोरडा असून, ३ मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याच्या खाली आहे. दोन प्रकल्पांत २५ टक्क्य़ांच्या आत जलसाठा आहे. ५७ लघुसिंचन प्रकल्पांपैकी १२ कोरडे असून ३७ लघुसिंचन प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याच्या खाली आहे. २५ टक्क्य़ांपेक्षा अधिक जलसाठा असलेल्या लघुसिंचन प्रकल्पांची संख्या केवळ दोन आहे.