जालना जिल्ह्यातील  देहूगाव ( ता. बदनापूर ) येथे मनाला चटका लावणारी घटना घडली. मामाच्या गावी सुट्टीसाठी आलेल्या आराधना लोखंडे (वय १०) या चिमुरडीचा मंगळवारी जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत हुगे आयमन ( वय ५) ही चिमुरडी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या दोघी उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावी आल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी आयमन किराणा दुकानात खेळत होती. नमाजाची वेळ झाल्यामुळे दुकान उघडे ठेऊन दुकानदार नमाजसाठी निघून गेले. त्यावेळी आराधना पेप्सी घेण्यासाठी दुकानाकडे आली होती. मात्र, या दुकानात लागलेल्या आगीत ती भाजली गेली. आग नक्की कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.  नमाजला गेलेले दुकानदार परत आल्यानंतर त्यांना दोन मुली भाजलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने दोन्ही मुलींना  बदनापूर रुग्णालयात दाखल केलं.

प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी आराधना नावाच्या चिमूकलीचा मृत्यू झाला. या घटनेत भाजलेली आयमनची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जालना जिल्ह्यातील डोणगाव गावातून आराधना मामाच्या गावी आली होती. गंभीररित्या भाजली गेलेल्या आयमनही  कन्नड तालुक्यातील हिवरखेडा या गावातील आहे.