पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱयाला निवृत्तीनंतरचे लाभ देण्याचा औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले नाही म्हणून शिवसेना आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष संदीपान भुमरे यांना दोन महिने कैदेची शिक्षा शुक्रवारी सुनावण्यात आली. कामगार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी शेख गफूर शेख हुसेन यांना निवृत्तीनंतरचे लाभ देण्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिला होता. मात्र, त्याचे पालन केले नाही म्हणून शेख हुसेन यांनी वकील रमेश इमले यांच्यामार्फत कामगार न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणीनंतर कामगार न्यायालयाने आमदार भुमरे आणि कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक भीमराव डोके या दोघांना दोन महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न केल्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली.