गुड्डया खून प्रकरणातील फरार आरोपीपैकी आणखी दोन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली. बुधवारी पोलिसांनी भिमा देवरे आणि योगेश जगताप या दोघांना पकडून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) ताब्यात दिले. तसेच फरार विक्की गोयरला मोबाईल आणि पैसे देणार्‍या भुषण ठाकरे याला फागणे येथून एलसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणात प्रमुख आरोपींपैकी ४ आणि मदत करणारे ४ असे एकुण ८ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

रफीयोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डया या गुंडाच्या खून प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकूण ११ प्रमुख आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरु झाला असून फरार प्रमुख आरोपींपैकी दोन मारेकर्‍यांना आज दोंडाईचा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपपोलिस निरीक्षक मोरे आणि त्यांच्या पथकाने पहाटे ३ वाजता शिताफिने अटक केली. या दोघांचा मुख्य ११ आरोपींमध्ये समावेश असून त्यांना सकाळीच धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण अर्थात एलसीबी पथकाच्या ताब्यात दिले. भिमा रमेश देवरे हा देखील राजा भद्राचा भाऊ आहे. यापूर्वी राजा भद्राचा भाऊ दादू देवरेला पोलिसांनी कसारातून अटक केली होती. प्रमुख ११ आरोपींपैकी ४ आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र गुड्डयाच्या मारेकर्‍यांमध्ये सामिल गोयर कंपनी अद्यापही पोलिसांच्या हाती लागली नसून त्यांचा शोध युध्दपातळीवर सुरु असल्याचे तपास अधिकारी हिम्मत जाधव यांनी सांगितले.

मदत करणार्‍यांवरही बडगा

गुड्डयाचा खून करुन पळालेल्या गोयर आणि देवरे टोळीतील गुंडांना मदत करणारे आता प्रामुख्याने पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपींना आश्रय देणारे मदत करणार्‍यांना तपास अधिकारी हिम्मत जाधव यांनी चौकशीसाठी बोलविले होते. चौकशी अंती संबंधित आश्रयदाते कुठल्याही प्रकारचे सहकार्य पोलिसांना करत नव्हते त्यामुळे पोलिसांनी योगेश जयस्वाल (रा.धुळे), प्रकाश मोरे (रा.उल्हासनगर) आणि महेंद्र यशवंत खैरनार (रा.कासारे ता.साक्री) या ३ जणांना रात्री अटक केली. तसेच आज फागणे येथील भुषण ठाकरे नामक तरुणाला धुळे एलसीबीने ताब्यात घेतले. यातील भुषण ठाकरेने मुख्य आरोपी विक्की गोयर याला पैसे देत मोबाईल देखील घेवून दिला असल्याचे समोर आले. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने फरार विक्की गोयर आणि पापा गोयर आदींबाबत महत्वाची माहिती हाती लागणार असल्याची शक्यता पोलिसांनी यावेळी वर्तवली.