पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय उपखंडातील नऊ प्रजातींपैकी तीन प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि पातळ चोचीचे गिधाड या तीन प्रजाती ९९ टक्के नष्ट झाल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर आता इजिप्शियन गिधाड आणि राजा गिधाड (रेड हेडेड व्हल्चर) या दोन प्रजातीसुद्धा अनुक्रमे ८० व ९१ टक्के नष्ट झाल्याचे एका संशोधन अहवालातून समोर आले आहे.
बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) आणि आरएसपीबी (रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स)च्या संशोधकांचा शोधप्रबंध एप्रिल २०१४ मध्ये केंब्रिज जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यात त्यांनी तीन जिप्स प्रजातीच्या गिधाडांसह इजिप्शियन गिधाडे आणि राजा गिधाडांवरसुद्धा डायक्लोफिनॅक या पशुवैद्यक वेदनाशामक औषधामुळे नामशेष होण्याची वेळ आल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.
उत्तर भारतातील संरक्षित क्षेत्रात आणि रस्त्यालगत १९९२ ते २०११ दरम्यान हा सव्‍‌र्हे करण्यात आला. २००६ मध्ये केंद्र व राज्य सरकारने गिधाडांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डायक्लोफिनॅक या वेदनाशामक औषधावर बंदी आणली होती. मात्र, प्रभावी अंमलबजावणीअभावी छुप्या मार्गाने त्याचा वापर सुरूच होता. बीएनएचएस आणि तत्सम काही संस्थांनी या औषधाच्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी म्हणून सरकारवर दबाव आणणे सुरू केले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या दहा वर्षांत तीन जिप्स प्रजातीच्या गिधाडांची संख्या स्थिरावली आहे.
त्याच वेळी इजिप्शियन गिधाडे आणि राजा गिधाडांची संख्यासुद्धा स्थिरावल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

फक्त जिप्स प्रजातीची गिधाडेच नव्हे, तर गिधाडांच्या इतर प्रजातीसुद्धा डायक्लोफिनॅकमुळे नामशेषाच्या मार्गावर आल्या आहेत, हे या अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात इतर प्रजातींवर नामशेषाचे गंडांतर येऊ नये म्हणून सखोल संशोधनाच्या माध्यमातून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. – क्रिस बॉडन, आंतरराष्ट्रीय ‘सेव्ह’ प्रकल्प व्यवस्थापक

डायक्लोफिनॅकवरील बंदीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. तरीही सखोल संशोधनाच्या माध्यमातून त्याचे परिणामकारक संवर्धन झाले पाहिजे. रेड हेडेड व्हल्चर आणि इजिप्शियन गिधाडांच्या वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित करून संशोधनावर अधिक भर द्यायला पाहिजे.  -डॉ. असद रहमानी, संचालक, बीएनएचएस