अभिनेता सलमान खान याच्यावर दाखल झालेल्या खटल्यात दोघा नगरकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या खटल्यात सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाल्याने नगरकरांचा या खटल्यातील सहभाग ठळकपणे अधोरेखित झाला.
सरकारी वकील आणि जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस योहान मकासरे व मूळचे नगरकर असलेले मुंबईतील नायगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शेंगाळे हे दोघे या खटल्याशी संबंधित आहेत. मकासरे हेही त्या वेळी मुंबईतील बोरिवली न्यायालयात नियुक्त होते. प्राथमिक न्यायालयात तेच या खटल्यात सरकारी वकील होते. नायगाव पोलीस ठाण्याचे त्या वेळेचे निरीक्षक शेंगाळे यांनी ही फिर्याद दाखल करून घेतली होती व तेच या गुन्ह्य़ाचे तपासी अधिकारीही होते. ते मूळचे श्रीरामपूरचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे या खटल्याच्या निमित्तानेच या दोन्ही नगरकरांचा परस्पर परिचय झाला.
मकासरे यांनीच ‘लोकसत्ता’शी बोलताना ही आठवण ताजी केली. सन २००३ ते २००८ या काळात ते बोरिवली न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्तीस होते. पुढे त्यांची पुन्हा नगरला बदल झाली. त्यांनी सांगितले, की सलमानच्या विरोधातील खटला सुरुवातीला मुंबईच्या महानगर न्यायालयात दाखल झाला होता. त्या वेळी सलमानच्या विरोधात ३०४ अ (मृत्यूस कारणीभूत) हे कलम लावण्यात आले होते. मात्र प्राथमिक टप्प्यातच त्याऐवजी ३०४ (२) (सदोष मनुष्यवध) हे कलम लावण्यास भाग पाडले. तसा पुरावाही त्या वेळी न्यायालयात सादर केला होता. हे कलम लागल्यामुळेच त्या वेळी हा खटला सत्र न्यायालयात वर्ग झाला, त्यामुळेच सत्र न्यायालयात सलमान खानला मोठी शिक्षा झाली आहे. हे कलम बदलण्यास माझ्यासह त्या वेळी अन्य सरकारी वकिलांनी मोठेच श्रम घेतले व त्यात मोठय़ा तणावाचाही सामना करावा लागला, असे मकासरे म्हणाले.