औरंगाबाद आणि वाळूज परिसरात मागील चार दिवसांपासून दोन बहिणीच्या अपहरणाची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी ५ वी आणि ७ वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या बहिणींचे शाळेतून घरी येत असताना अपहरण झाले होते. एका दुचाकीस्वाराने घरी सोडतो, असे सांगत या मुलींचे अपहरण केले. मुलींच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलींची शोध मोहिम सुरु केली. पोलिस युद्धपातळीवर शोध घेत असल्याचे समजताच अपहरणकर्त्याने मुलींना सुखरूप घरी सोडले आणि तो पसार झाला. त्यामुळे या मुलींना त्याने कोणत्या कारणासाठी पळवून नेले होते हे अद्याप गूढच आहे.

मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तपासाला सुरुवात केली. त्यात नाना अभंग या इसमावर संशय व्यक्त करण्यात आला. या संशयाने तपासला एक दिशा दिली. दोन पोलीस पथक, सायबर सेल आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने तपासाला गती मिळाली. विहीर, झाडे झुडपं, शेततळे, नाले सगळीकडे ड्रोन कॅमेऱ्यातून शोध घेतला, मात्र हाती पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

पोलिसांनी तपासाची दिशा बदलत आरोपी ज्या दिशेनं गेला त्या रस्त्यावरील पेट्रोल पंप, हॉटेल आणि त्यानंतर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. वाळूज पासून सुरु झालेला हा मार्ग खुलताबाद, सिल्लोड, शिपोरामार्गे भुसावळपर्यंत पोहचला. फुटेज मिळाले पण आरोपी काही पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपीच्या मागावर एक तुकडी असताना दुसरी तुकडी त्याचे मूळ गाव श्रीरामपुरकडे रवाना केली. आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे आरोपीशी संपर्क झाला. फोनवर काहीही न बोलणाऱ्या अभंगने गुपचूप दोन्ही मुलींना घराकडे पाठवलं.

एमएटी गाडीवरुन त्याने दोन मुलींसह शेकडो मैलाचा प्रवास केला. प्रवासादरम्यान मुलींचा मामा असल्याचे त्यानं सांगितलं. त्यांना धमकावून ते म्हणून ही घेतलं. मुलींना खाऊ पिऊ घातलं. देऊळगाव राजा इथं नवे कपडे खरेदी केले. आणि पुढचा प्रवास सुरु केला. मंदिरात, शेतवस्तीवर मुक्काम करत तो प्रवास करत होता. त्यामुळे पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, त्याच्या घरात सापडलेल्या गोष्टींवरून गूढ आणखी वाढलं. संशयित आरोपी  नाना अभंगच्या घरात मांडूळ, साप आणि देवीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे गुप्तधनासाठी त्याने अपहरण केल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. सध्या दोघी मुली आपल्या घरी सुखरूप पोहचल्यात. पोलीस आरोपीला पकडल्यानंतरच अपहरणाचे गूढ उकलेल.