स्थायी नोकरी मिळावी या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या संगणक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला त्यात बरेच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त येणार होते. त्यावेळी त्यांच्यासमोर श्री मोहिनी कॉम्प्लेक्स येथे २०० संगणक शिक्षकांनी आंदोलन केले.

प्रचलित नियमांनुसार वेतन मिळावे या मागणीसाठी शिक्षक आंदोलन करीत होते. विनोद तावडे यांनी आमच्यासमोर येऊन आमचे निवेदन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्याच ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडला.
विनोद तावडे समोर येत नाही असे पाहून काही शिक्षकांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या बॅरीकेड्स हलविण्यास सुरुवात केली.

त्यानंतर, हा जमाव अनियंत्रित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या हल्ल्यात अनेक शिक्षक जखमी झाले आहेत. दोन महिला शिक्षिकांना जबर मार बसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याआधी, गडचिरोली, औरंगाबाद या ठिकाणी कायम विनाअनुदित शाळांमधील शिक्षकांनी आंदोलन केले होते त्यांनादेखील पोलिसांचा मार खावा लागला होता.