खा. उदयनराजे भोसले यांचा इशारा

‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करणे आणि मराठा आरक्षण या विषयावर शासन विशेष अधिवेशन का बोलावत नाही, असा प्रश्न करत मराठा समाजाच्या मागण्यांकडे आता दुर्लक्ष झाल्यास उद्रेक होईल, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला. सामाजिक समतोल टिकविण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.  मराठा क्रांती मूक मोर्चात भोसले यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडले. कोपर्डीतील घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काळिमा फासणारी आहे. त्या नराधमांना फाशी द्यावी अथवा जनतेसमोर गोळ्या घालणे गरजेचे आहे. कोपर्डी प्रकरणातील संशयित न्यायालयातून सुटल्यास आपण काय करतो ते पाहाच, असेही ते म्हणाले. मराठा समाजातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. कृषिमालास भाव मिळत नसल्याने त्यांची कधीच प्रगती होत नाही. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाने हमीभाव देण्याची गरज आहे. विविध कारणांसाठी विशेष अधिवेशन बोलावले जाते. मग, मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या प्रश्नावर ही कृती घडत नाही. सरकारच्या या अन्यायामुळे भविष्यात नक्षलवादी तयार झाल्यास समाजहितासाठी त्यांचे नेतृत्व आपण करू, असेही त्यांनी नमूद केले. राज्यात सुरू असणारे मराठा क्रांती मूक मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. न्याय मिळत नसल्याने जनतेचा सरकार व पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. सध्या मराठा समाज मूक मोर्चे काढत आहेत. परिस्थिती बिघडली तर उद्रेक होईल. या प्रश्नावर शासनाने टोलवाटोलवीचे धोरण ठेवल्यास आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.