लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाने सोलून, दगडाने ठेचून संपवले पाहिजे. अशा घटनांतील आरोपी जामिनावर किंवा शिक्षेशिवाय सुटतात ही लोकशाहीची शोकांतिका आहे, यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केली. कोपर्डीपाठोपाठ कोरेगाव तालुक्यात तडवळे येथे एका पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर उदयनराजे यांनी वरील टीका केली आहे.

कोपर्डीपाठोपाठ कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावातही एका पाच वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेवरही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावर उदयनराजे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे वरील टीका केली. पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की अशा घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने समाज कोणत्या दिशेने चालला आहे हे मात्र समजून येत नाही. समाजात कायद्याचा धाक व नतिकता राहिली नाही. प्रगतीच्या नावाखाली समाजाची अधोगती सुरू आहे. या घटनेनंतर त्या मुलीस वैद्यकीय उपचाराची गरज होती मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. यावरून शासकीय यंत्रणा देखील किती निगरगट्ट आणि बोथट झाली आहे हे दिसून येते. सर्वसामान्यांच्या करातून वेतन घेणारे हे कर्मचारी आरोग्यसेवेसारख्या महत्त्वाच्या कामावर वेळेवर उपस्थित राहू शकत नसतील, तर अशा व्यक्तींना हिसका दाखवण्याची वेळ आली आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमावर न्यायिक कारवाई होऊन पिसाट व्यक्तीला तत्काळ फाशी द्यावी अन्यथा जनतेच्या ताब्यात देऊन सार्वजनिक चौकात चाबकाने सोलून काढले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पाच वर्षांच्या मुलीवर कोरेगावमध्ये बलात्कार

कोरेगाव तालुक्यात तडवळे गावामध्ये एका पाच वर्षांच्या मुलीवर गुरुवारी रात्री एकाने बलात्कार केला. संतोष आबासाहेब भोईटे असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याला येत्या ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित मुलगी आरोपीच्या घराशेजारीच राहत होती. ती घरात एकटीच असल्याचे पाहून भोईटे याने तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी भोईटेविरुद्ध वाठार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. घटनेनंतर फरारी झालेल्या भोईटेला पोलिसांनी लगोलग पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला आज अटक करण्यात आली. त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीपर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.