प्रांतांधिकाऱ्यांनी तरूणावर हल्ला केल्याचा आरोप; निषेधार्थ आज ‘कराड बंद’
कराड तालुक्यातील बहुचर्चित वडोली भिकेश्वर-धनकवडी येथे कृष्णा नदी पात्रातून राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईदरम्यान प्रांताधिकाऱ्यांनी एका तरुणावर हल्ला केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी केला. प्रांताधिकारी किशोर पवार यांना लक्ष्य करून त्यांनी संताप व्यक्त केला.
कराड तालुक्यातील बेकायदा वाळू उपशाबाबत गुरूवारी मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उदयनराजे शुक्रवारी तातडीने कराडमध्ये दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या कारवाईत सचिन काशीनाथ पवार (३६, रा. गजानन हौसिंग सोसायटी) याच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असल्याचे सांगत या कृत्याच्या निषेधार्थ उद्या शनिवारी कराड बंदची हाक दिली. प्रांताधिकारी किशोर पवार यांनी, संबंधित तरुणास मारहाण झालेली नसल्याचे स्पष्ट केले. बेकायदा वाळू उपशाविरुद्ध सुरू असलेली कारवाई अजून सक्त करण्याचे संकेतही त्यांनी दिले. उदयनराजेंचा संताप आणि किशोर पवारांची आक्रमक भूमिका पाहता या प्रकरणी नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
उदयनराजे म्हणाले, की लोकसेवकांकडून लोकांचे प्रश्न सोडवण्याची अपेक्षा असते. मात्र, बेभान होऊन न्यायदंडाधिकारीऱ्यांनी न्याय बाजूला ठेवला. प्रांतांनीच पवारवर प्राणघातक हल्ला केला. तो गंभीर जखमी आहे. कराडचे प्रांत व तहसीलदारांकडून मनमानी कारभार आणि जनतेची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करत आपण याबाबत पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी किशोर पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ह्लउदयनराजेंना कोणीतरी काहीतरी सांगितले. त्याप्रमाणे ते बोलले असतील. पण, कायद्याचे रक्षण करणे आमचे काम आहे. बेकायदा काम करणाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर आमच्यावर आरोप होत असतील तर ते योग्य नाही. प्रशासनाने कायदा राबवायचा की नाही? वाळू तस्करांवर मोक्काअंतर्गत कारवाई होऊ शकते. वेळप्रसंगी जिलेटिनने बेकायदा वाळू उपशाच्या बोटी उडवून देण्यात येतील. धोका पत्करून कारवाई करावी लागत असताना, ती आम्ही केली असून, सचिन पवारला आम्ही मारहाण तर केली नाहीच, उलटपक्षी आमच्याच वाहनातून त्याला आम्ही दवाखान्यात हलवले. या कारवाईत ४२ वाळू वाफे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. वाळूने भरलेले व रिकामे असे जवळपास १०० ट्रक ताब्यात घेण्यात आले. त्यातील काही रिकाम्या ट्रकची कागदपत्रे पडताळून परिवहन खात्याने हे ट्रक सोडून दिले आहेत. वाळू उपशाच्या ३२ बोटी, कारवाईच्या ठिकाणी साडेआठशे ब्रास वाळूसाठा मिळून आला आहे.ह्व
या गुन्ह्य़ात सुधीर विलास साळुंखे (रा. वडोली-भिकेश्वर) हा म्होरक्या म्हणून पुढे आला असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
धोका पत्करून कारवाई करावी लागत असताना, ती आम्ही केली असून, सचिन पवारला आम्ही मारहाण तर केली नाहीच, उलटपक्षी आमच्याच वाहनातून त्याला आम्ही दवाखान्यात हलवले
– किशोर पवार, प्रांताधिकारी, कऱ्हाड