दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

सागवानच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल झाल्याचे निदर्शनास आल्याने खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले. वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ढेबेवाडी हद्दीतील बेकायदा वृक्षतोडीची सखोल चौकशी करून, दोषींवर कडक कारवाई व्हावी. अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असतील त्यांचीही गय केली जाऊ नये अशा सक्त सूचना उदयनराजे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ढेबेवाडी खोऱ्यात विनापरवाना सागवानाच्या ४५० झाडांची तोड होऊन या लाकडांची तस्करी झाली असल्याची बाब उदयनराजे यांना समजताच त्यांनी ढेबेवाडी वनविभागास भेट देऊन वृक्षतोड झालेल्या ठिकाणांची पाहणी केली.

यावेळी उदयनराजे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच  धारेवर धरले. एकीकडे शासनामार्फत दोन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असताना दुसरीकडे मात्र, बिनदिक्कत वृक्षतोड चालली आहे. ही बाब गंभीर असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

वृक्षतोड रोखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे तसेच खासगी हेर नेमून त्यांच्यामार्फत जंगल तोडीवर नजर ठेवा. यापुढील काळात लाकूडतोड खपवून घेतली जाणार नाही.

जो कोणी लाकूड चोरी करीत असेल किंवा त्यांना वनखात्यातील कोणी अधिकारी वा कर्मचारी सहकार्य करीत असेल तर त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे उदयनराजे यांनी बजावले.